ज्ञानसागर, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले!
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ चिंतक, ज्येष्ठ संपादक-विचारवंत श्री मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निधनाने एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला आम्ही सारे मुकलो आहोत. बाबुराव शतायुषी होतील, ही खात्री होती. पण, काळाने त्यांना आमच्यातून हिरावून घेतले. त्यांच्या जाण्याने ज्ञानसागर, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, संस्कृत भाषेचे अगाध ज्ञान, कोणताही किचकट विषय सहजसोपा करून सांगण्याचे कसब, मराठी भाषा आणि व्याकरणावरील सिद्धहस्त लेखक अशी कितीतरी बिरूदं अपुरी पडतील, इतकं अथांग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे समाजमन पाहत असे. केवळ संघसेवा नव्हे तर संघविचार रूजविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यासाठी हालअपेष्टाही सहन केल्या, अशा मा. गो. वैद्य यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीही भरून न निघणारीच अशीच आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.