सोहम घाडगे |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजर्षी शाहू फाऊंडेशनच्या वतीने चिखली येथे १६ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंस्फूर्तीने तब्बल ९१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे स्त्रीशक्तीने रक्तदानासाठी पुढाकार घेत एक वेगळा आदर्श निर्माण केला.
राज्यातील रक्तपेढ्यांमधील सध्याचा अत्यल्प रक्तसाठा पाहता पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी युवक, सामाजिक संस्थांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या राजर्षी शाहू फाऊंडेशनने या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ९१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे अनन्या सुनील चिंचोले, शीतल अरुण गरुड, विजयश्री शैलेश अंभोरे या तीन जणींनी रक्तदान केले. बुलडाणा येथील जीवनधारा रक्तपेढीच्या चमूने रक्तसंकलनाचे काम केले.
प्रारंभी संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे सर्वच क्षेत्रात अतुलनीय काम आहे. ८० व्या वर्षीही ते तरुणाला लाजवेल यापद्धतीने राजकारण, समाजकारणात सक्रिय आहेत. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलित करून त्यांच्या कार्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. यावेळी राजर्षी शाहू पतसंस्थेचे स्थानिक संचालक सुभाष गायकवाड, भीमराव आंभोरे, शे. सादिक शे. फारुख, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील, संजय गाडेकर, शंतनू बोन्द्रे, शेखर बोन्द्रे, प्रतापसिंग पवार, सुभाष देव्हडे, ऋषिकेश म्हस्के, अशोक सुरडकर, काळे मामा, नानाभाऊ चिंचोले, रवी तोडकर, शैलेश आंभोरे, गोलू काळे, अमोल खेडेकर, सागर पुरोहित, प्रशांत एकडे, शिवाजीराव भगत, शैलेश काठोळे, प्रा. सवडतकर, प्रशांत झिने, शेख अजीम खान, श्रीधर पवळ, गजानन गायकवाड, प्रशांत डोंगरदिवे, जयश्री कुटे, सुनील सोळंकी, संदीप बांबल, विजय महाजन, दीपक गायकवाड, सचिन लोखंडे, चेतन पाटील, अशोक पाटील, वैभव म्हस्के, समाधान गाडेकर, पुरुषोत्तम हाडे, शुभम पाटील, राहुल सुरडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संचालन राजर्षी फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष शैलेशकुमार काकडे यांनी केले.