सर्व जातीधर्माच्या नागरिकांचा सहभाग : जिल्हा पोलिस विभागाचा उपक्रम
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील सामान्य नागरिक व पोलिसांमध्ये सामाजिक सलोखा राहावा यासाठी पोलिस विभागाच्या वतीने कौमी एकता चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर चषकामध्ये पोलिसांसोबतच सामान्य नागरिक एकाच टीममध्ये सहभागी होऊन क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करतील. त्यामुळे समान्यांसह पोलिसांमध्ये सदर चषकातून जवळीक निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात जातीय सलोखा कायम राहावा, शांतता नांदावी, सामाजिक एकोपा कायम राहावा, सर्व धर्मांमध्ये बंधूभाव कायम रहावा आणि पोलिस व जनतेमध्ये सुसंवाद असावा यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलिस आणि सर्व धर्मिय बाधव यांची क्रिकेट टीम बनवून कौमी एकता चषकाअंतर्गत क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कॅप्टन व ५ पोलिस अंमलदार खेडाळूंची भूमिका बजावत आहेत. इतर ६ खेडाळूंमध्ये सर्व जाती-धर्माच्या बांधवांचा समावेश आहे. या स्पर्धेमुळे पोलिस व जनतेत संबंध दृढ होतील व सामाजिक एकोपा कायम राहून आपसात बंधुभाव वाढेल या संकल्पनेतून कौमी एकता चषकास शास्त्री स्टेडियम येथे सुरुवात झाली. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात खदान संघाने सात विकेटने विजय मिळविला. दुसर्या सामन्यात जुने शहर पोलीस स्टेशन दोन धावांनी विजय झाले. तिसऱ्या सामन्यात सिविल लाइन संघाने 9 विकेटने तर चौथ्या सामन्यात रामदास पेठ संघाने विजय मिळविला. डाकी रोड संघाने सिव्हिल लाईन्स अंगावर 31 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक दिली. स्पर्धेकरता जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन प्रशांत केदारे, सलीम मामू, स्कोरर अजय पिंपळकर, अंपायर नितीन तेलगोटे, सागर पांडे, बंटी क्षीरसागर, देवा तर कॉमेंट्री म्हणून गोपाल मुंडे काम पहात आहेत.
चषकात 26 संघाचा समावेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशांचे पालन करून या चषकात २६ टीमने सहभाग घेतलेला आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनची एक टीम सहभागी आहे. उपविभागांच्या मैचेस या अकोट, बालापूर, मूर्तिजापूर येथे होणार आहेत. सेमी फाइनल व फाइनल मॅचेस या शास्त्री स्टेडियम येथे होणार आहेत.
खेडाळूंमध्ये पोलिस अधीक्षकांचाही सहभाग
जातिय सलोखा रहावा यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या चषकामध्ये सर्वच पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहभाग घेत आहेत. स्पर्धेत सर्वांचा उत्साह कायम राहावा म्हणून पोलिस मुख्यालया क्रिकेट टीम मधून जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर हे खेळणार आहेत. एसडीपीओ सचिन कदम सुद्धा त्यांच्या शहर विभागातील क्रिकेट टीममध्ये सहभागी होणार आहेत. पुढील आगामी सामान्यांमध्ये पोलिस आणि पत्रकार यांच्या मध्ये ही क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.