सातारा जिल्हा माहिती अधिकारी श्री. युवराज पाटील लिखित ”माझा सातारा” या चित्रमय पुस्तकाचे प्रकाशन…!!
काय आहे या पुस्तकात :-
सातारा जिल्हा म्हटले की, निसर्ग सौंदर्याची लयलूट. महाबळेश्वर, पाचगणी येथील विहंगम सह्याद्रीच्या कड्याकपारीतील सौंदर्य, कासचा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येणारा फुलांचा महोत्सव. पण साताऱ्यात याबरोबरच शौर्याच्या अनेक पाऊलखुणा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी रण गाजवलेल्या अनेक घटना आजही या जिल्ह्याच्या हृदयात आहेत. उभ्या महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या अनेक घटनाही याच जिल्ह्यात घडलेल्या आहेत. निसर्ग सौंदर्यासाठी सातारा जिल्हा दक्षिणेचा काश्मीर म्हणून जसा ओळखला जातो, तसेच भारताच्या इतिहासातील वैभवी पान म्हणूनही या जिल्ह्याचे महत्व अपार आहे.
आजही हा जिल्हा देशातला सैनिकी जिल्हा म्हणून ओळखला जातो. हजारो भूमीपुत्र आजही देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. ही आहे या जिल्ह्याची खासियत. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाण्याबरोबर प्रकाशही देत आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राच्या कपाळावरची ललाट रेषाच असावी जणू, एवढं या कोयना धरणाचे महत्व आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणांचा दिशादर्शक म्हणूनही कोयनेकडे पाहिले जाते. पर्यटन, इतिहास, याबरोबर धार्मिक अधिष्ठान असलेली अनेक ठिकाणं या जिल्ह्यात आहेत. या सर्व श्रीमंतीबरोबर या जिल्ह्याने विकासात्मक कार्यातही राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या समोर अनेक मैलाचे दगड निर्माण केले आहेत. हे सगळे शाश्वत विकासाचे प्रारुप अनेक जिल्ह्यासाठी दिशादर्शक आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांसाठी एकत्र मिळाव्यात म्हणून माझा सातारा पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे.