वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई:राज्यात सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राचा आढावा व नवीन कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित असून, त्यापैकी ११ केंद्रांवर हमी भावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत, असे निर्देश पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. याचबरोबर सन २०२०-२१ मधील हमी दरावरील कापूस खरेदी-परतावा आणि कापूस लागवडीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील एका केंद्राची निवड करून इत्यंभूत माहिती अद्ययावत करावी. जेणेकरून शासनाकडे शेतकऱ्यांची अचूक माहिती संकलित होईल आणि कापूस परतावा योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ, कापूस लागवडीच्या अनुषंगाने 7/12 ची तपासणी, बँक खात्याची माहिती आणि आधार कार्डद्वारे ओळख पटविणे यासाठी प्रायोगिक तत्वावर केंद्राद्वारे एपचा वापर करण्यात यावा. ज्या तालुक्यात कापूस पीक पेऱ्याचे क्षेत्र जास्त आहे, मात्र तेथे जिनिंग-प्रेसिंग सुविधा उपलब्ध नाही त्यांना नजीकच्या तालुक्यातील जिनिंग-प्रेसिंगशी संलग्न करण्याचे नियोजन करून खरेदी केंद्र सुरू करावीत. सरकी आणि रूईच्या नुकसानीबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही पणनमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.