वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नांदुरा: सततच्या भांडणाला कंटाळून माय लेकाने धारदार शस्त्राचे वार करून पंचेचाळीस वर्षीय वडीलाचा खुन केल्याची घटना 6 डिसेंबररोजी नांदुरा तालुक्यातील गोशिंग येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून माय लेकांना अटक केली आहे.
बोराखेडी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नांदुरा तालुक्यातील गोशिंग येथील बाबाजान नाना शेगर याने बोराखेडी पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार गावातीलच त्याचा भाऊ जगन नाना शेगर यास दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे त्याचे परिवारासोबत नेहमी खटके उडत होते. मागील दोन महिन्यापासून जगन शेगर हा जास्तच दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याचे दररोज पत्नी व मुलासोबत भांडण होत होते. दरम्यान 6 डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जगन हा जास्त दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याचे मुलगा व पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी मुलगा राजेंद्र जगन शेगर याने त्याची आई मंदाबाई जगन शेगर यांच्या मदतीने वडील जगन शेगर याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.