समृद्धी महामार्ग ठरणार विदर्भाची भाग्यरेषा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
462

मुख्यमंत्र्यांनी केली समृध्दी महामार्गाची पाहणी

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अमरावती: विदर्भाच्या सर्वागीण विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्वाकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने समृध्दी आणणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या 1 मेपर्यंत पूर्ण होऊन तो प्रत्यक्ष वाहतूकीसाठीही खुला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महागार्गाच्या विदर्भातील सुमारे 347 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच त्‍यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवनी-रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरुन प्रवास करुन सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना या रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला.

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार विरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिक्षक हरी बालाजी उपस्थित होते.
नागपूर- मुंबई शीघ्र संचार दृतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी 8 हजार 364 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे 60 टक्क्यापेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणाच्याही कामांना प्राधान्य देण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील 38 नाल्यांचे 91 हजार 210 मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृध्दी देखील झाली आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे या कामामध्ये विलंब झाला नाही. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट महामार्ग ठरणार असून नागपूर ते शिर्डी हा मार्ग 1 मे र्यंत व त्यानंतर मुंबई पर्यंतचे काम पुढच्या एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा महामार्ग दळणवळणाच्या सर्वोत्कृष्ठ सुविधांसोबतच कृषी व पुरक उद्योगांनाही प्रोत्साहन देणारा ठरणार असल्यामुळे तो राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी रोल मॉडेल ठरेल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे नागूपर ते मुंबई शिघ्रसंचार दृतगती मार्गापैकी अमरावती जिल्ह्यातून 73.33 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील 46 गावांमधून जाणार आहे. 2 हजार 850 कोटी रुपये खर्चून तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. या महामार्गावर दोन इंटरचेंज प्रस्तावित आहेत.

समृध्दी महामार्ग ठरले हेलीपॅड
अमरावती जिल्ह्यातील समृध्दी महामार्गाच्या बांधकमाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हेलीकॉप्टरचे या महामार्गावरच विशेष तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर सकाळी 11.35 वाजता आगमन झाले. श्री. ठाकरे यांचे आगमन होताच पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वनमंत्री संजय राठोड यांनीही स्वागत केले. स्वागताचा स्वीकार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहा किलोमीटर प्रवास करुन प्रत्यक्ष पाहणी केली.
प्रकल्प प्रमुखांनी सादर केला कामाच्या प्रगतीचा अहवाल 
नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्प प्रमुख श्रीमती संगीता जयस्वाल यांनी सादरीकरणाव्दारे टप्पा तीनमधील कामाच्या प्रत्यक्ष प्रगतीची माहिती यावेळी सादर केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृध्दी महामार्गाच्या बांधकामासंदर्भात माहिती दिली.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
Next articleविद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पॉलीटेक्नीक प्रवेशास 12 डिसेंबरपासून प्रारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here