महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळ: लोणावळा

0
381

वऱ्हाड दूत विशेष
जर तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे ठरवित असाल तर,थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्याला नक्की भेट द्या.
लोणावळा मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा लोणावळा शहरातून जातो. मुंबई पुणे दरम्यानचं प्रसिद्ध असं थंड हवेचे ठिकाण म्हणजेच लोणावला. निसर्गरम्य वातावरण ,डोंगर रांगा, हिरवी , घनदाट झाडे, विपुल वनराई, खोल दऱ्या, धुके ,कोसळणारे धबधबे, जलाशय या साऱ्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो.
पावसाळ्यात झाडे हिरवीगार होतात. तर हिवाळ्यात डोंगरांनी जणु धुक्याची चादर पांघरलेली दिसते.
उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची झाडे अर्थात जांभळे आणि करवंदाची लयलूट दिसते.
लोणावळापासून १२ किलोमीटर अंतरावर वसलेले आई एकवीराचे देवस्थान कार्ला गडावर स्वयंभु असुन अतिशय प्राचीन आहे. एकाग्रतेचे प्रतीक असलेली आई एकवीरेचं मंदिर मुंबई-पुणे महानगराच्या मध्यभागी आहे.या देवस्थानाची ख्याती दूरवर पसरलेली आहे. कोळी समाजाची ही कुलदेवी आहे. हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी एका रात्रीत मंदिराची स्थापना केली. त्याचप्रमाणे येथील प्राचीन बुद्धकालीन लेणी पाहण्यासारखी आहेत. आईच्या मंदिरा शेजारी। “ प्राचीन बौध्द इतिहासप्रसिध्द कार्ला लेणी“ आहेत. येथील शिल्प चैत्यगृह, बौध्दशिल्पे, सिंहस्तंभादी शिल्पे, मुख्य गुंफा, सभा मंडप, उत्तुंग सिंहस्तंभ, स्तंभावरील शिल्पे, काष्ठकाम, भित्तीचित्रे, शिलालेखांसाठी ही लेणी जगप्रसिध्द आहे. अनेक कोळी बांधवांची कुलस्वामिनी असल्याकारणाने दुरूवरून लोक आपल्या कुलदेवीला वर्षातून एकदा भेट देण्याकरिता येथे येतात.अश्विन व चैत्र महिन्यात या देवीची यात्रा असते. मंदिराच्या परिसरात राहण्याची सोय आहे. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र शासनाचे एमटीडीसी हे मंदिरापासून जवळपास ४.५ किलो मिटर अंतरावर म्हणजेच मंदिरापासून दहा मिनिटांवर आहे.

सुरक्षेच्यादृष्टीने एमटीडीसी कार्ला हे सुरक्षित अतिशय ठिकाण आहे. येथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांकरिता वॉटर पार्क, मनोरंजन पार्क आहे. विरंगुळ्याकरिता बुद्धिबळ, सायकलिंग उपलब्ध आहे. या परिसरात इंद्रायणी नदी आहे.नदीत बोटिंग सेवा आहे. कार्ला येथील लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी श्री महादेव हिरवे खूप चांगल्या रीतीने पार पाडत आहेत.त्याचप्रमाणे ते उत्तम मार्गदर्शन करणारे देखील आहेत. प्रादेशिक व्यवस्थापक श्री दीपक हरणे यांनी निसर्गाचे अस्तित्व कायम राखले आहे. परिसरात भरपूर झाडे शुद्ध हवा यामुळे प्रकृतीचे महत्त्व असल्याचे दिसून येते.
जर तुम्ही लोणावळा खंडाळा फिरायला जाणार असाल तर, कुणे धबधब्याला अवश्य भेट द्या. कुणे धबधबा हा २००मीटर वरून तीन टप्प्यात कोसळतो.यापैकी सर्वात उंच टप्पा १०० मीटरचा आहे. हा भारतातील धबधब्यांपैकी १४ व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. पर्यटकांना पाहण्यासाठी कार्ला लेणी, भाजे लेणी, रायवूड उद्यान ,भुशी डॅम ,खंडाळा लेक ,टायगर पॉईंट ,राजमाची गार्डन , डूक्स नोस लोहगड विसापूर फोर्ट, पवना लेक, तिकोना फोर्ट , कोरीगड, टेबल टॉप ,नारायणी धाम मंदिर ,बेडसे लेणी इत्यादी भेट देण्यासाठी उत्तम जागा आहेत.
सद्यस्थितीत सर्वच रिसॉर्टमध्ये कोरोनाबाबत योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात आल्याची खात्री करावी. सोशल डिस्टन्स, ऑक्सीमिटर, शरीराचे तापमान मोजण्याची यंत्रणा यांसारख्या बाबींची योग्य काळजी घेतली तर आपल्याला या पर्यटन स्थळाला भेट देण्यात काही हरकत नाही.

– वर्षा वासुदेव भावसार, मुंबई

Previous articleवस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार !
Next articleअमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; पहिल्या फेरीत किरण सरनाईक आघाडीवर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here