वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: गेल्या काही महिन्यांपासून कोरोना संकटामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांतील जवळपास बंदच झालेला संवाद आजपासून सुरू होत असल्याचा मनापासून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया समर्थ पब्लिक स्कूलचे प्रा. नितीन बाठे यांनी आज व्यक्त केली.
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नातेच असे आहे की, ते समोरासमोर असल्याशिवाय त्याला रंगत येत नाही. खरा विद्यार्थी कोण असे मला जर विचारले, तर शिक्षकांना शिकविण्याची स्फूर्ती मिळवून देणाराच खरा विद्यार्थी असे मी म्हणेन. आणि खरा शिक्षकही कोण, तर ज्याला विद्यार्थ्यांचा चेहरा पाहिल्याबरोबर त्याच्या मनातील शंका, प्रश्न समजतात तो! कोरोनामुळे या समोरासमोरच्या प्रक्रियेत काहीसा खंड पडला होता. ज्याप्रमाणे खऱ्या शिक्षकाला घरी करमत नाही, तसेच विद्यार्थ्यांनाही आपल्या शाळेची, आजुबाजूच्या परिसराची, वर्गमित्रांची आठवण येतच असेल. पण, आजपासून शासकीय नियमांच्या अधीन राहून शाळा सुरू होत असल्याने शिक्षक-विद्यार्थ्यांना भासणारी ही उणीव काही प्रमाणात भरून निघणार आहे, असे ते म्हणाले.
समर्थ पब्लिक स्कूलबाबत सांगायचे झाल्यास आम्ही शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरू करीत आहोत, हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते, असे सांगताना ते पुढे म्हणाले की, शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात दिलेल्या प्रत्येक सूचनेचे, त्या सूचनेतील प्रत्येक शब्दाचे कटाक्षाने पालन आम्ही केले आहे आणि यापुढेही करू, अशी ग्वाही त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या वतीने दिली.
विद्यार्थी आणि शिक्षकांसह शाळेतील प्रत्येक घटकाच्या आरोग्याची काळजी घेणे, ही जशी शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, तशीच ती विद्यार्थी व त्यांच्या पालकांचीही आहे. आपण सर्वच पालक सुजाण आहात. त्यामुळे काय काळजी घ्यावी, हे अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. पालकांकडून आम्हाला योग्य ते सहकार्य वेळोवेळी मिळाले तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात दिलेल्या सूचनांप्रमाणे व्यवस्थापनाने पूर्ण काळजी घेतली आहे. शाळेचे कर्मचारी, शिक्षक यांच्यासह समर्थ पब्लिक स्कूलचा अध्यक्ष या नात्याने मी स्वतःही कोविड-१९ ची चाचणी करून घेतली आहे. शाळेत जंतुनाशक, साबण, पाणी, सॅनिटायजरची व्यवस्था आवश्यक त्या सगळ्याच ठिकाणी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक अंतर ठेवण्याच्या अटीचे पालन होईल याकडेही आम्ही लक्ष देणार आहोतच. तसेच, सर्वच विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक नाही. विद्यार्थी आपल्या पालकांच्या संमतीनुसार शाळेत यायचे किंवा नाही, हे ठरवू शकतात. पण, तशी स्पष्ट सूचना पालकांनी शाळा व्यवस्थापनाला आगाऊ द्यावी, अशी विनंती त्यांनी यावेळी पालकांना केली. पालकांनीही काही सूचना असल्यास त्या शाळा व्यवस्थापनापर्यंत पोचवाव्यात. त्यांचाही नक्कीच विचार करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या प्रगतीसाठी जे जे काही शक्य असेल ते सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोतच. त्यासाठी आजवर समाजातील सर्वच घटकांनी वेळोवेळी मोलाची मदत केली. तशीच मदत यापुढेही होईल, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. शाळेच्या संचालिका जयश्री नितीन बाठे यावेळी उपस्थित होत्या.