वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील शंकर नगर भागातील शुभम प्रमोद जैन (वय 26) याचा अकोला महामार्गावर कोलारी फाट्यानजीक ट्रकने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे शुभमचा काल 25 नोव्हेंबररोजी वाढदिवस होता. त्याने आपला वाढदिवस मित्रांसोबत साजरा केला होता.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव येथील शुभम प्रमोद जैन (वय 26) व सुटाळा येथील रवींद्र सुधाकर जैन (वय 30) हे दोघे अकोला येथे एका मुलाखतीसाठी जात होते. कोलोरी फाट्यानजीक समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती की यामध्ये शुभमचा डोक्याला मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला तर रवींद्र जैन हा गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला चार फॅक्चर झाले असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने शंकरनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.