व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोलाः शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हयातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळुन उर्वरित क्षेत्राकरीता इयत्ता ९ वी ते १२ वी चे सर्व शासकीय व खाजगी शाळांचे वर्ग, वसतीगृह, आश्रमशाळा सोमवार दि. २३ पासून वर्ग सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहे.
शाळा सुरु करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांनी सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबत करावयाची कार्यवाही –
1) शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे:- शाळेत हात धुण्यासाठी सुविधा, Thermometer, Thermal Scanner/Gun, Pulse Oxymeter, जंतूनाशक, साबण, पाणी इ.आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी. वापरण्यात येणारे thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे. शाळा वाहतुक सुविधांचे निर्जंतुकीकरण सुनिश्चित करावे. एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे. क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.
2) बैठक व्यवस्था:- वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.
3) शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे- शाळेत दर्शनी भागावर Physical Distancing, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर किवा स्टीकर प्रदर्शित करावे. थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर Physical Distance) राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ इत्यादींचा वापर गर्दी होणारी ठिकाणे जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादी ठिकाणी करण्यात याव्या. शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात.
4) विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-१९ च्या संदर्भातील आव्हाने व त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागरुक करणे:- शाळा सुरु करण्यापूर्वीच विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांच्यात जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने पत्रके, पत्रे व सार्वजनिक घोषणांच्या माध्यमांचा वापर करुन पुढील मुद्दयांबाबत कार्यवाही करावी:-
वैयक्तिक स्वच्छता व नेहमी वापरण्यात येणारे पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण इत्यादीबाबत काय करावे किंवा काय करु नये याबाबतच्या सुचना, शारीरिक अंतर पालनाचे (Physical distancing) चे महत्व.,कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छता विषयक सवयी, कोविड-१९ बाबतच्या गैरसमजुती.,कोविड-१९ ची लक्षणे आढळल्यास शाळेत जाणे टाळणे., केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सुचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे (कोविड-१९च्या अनुषंगाने) अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध-उपचार घेत आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये.
5) माहितीचे एकत्रिकरण :- विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून पुढील माहिती स्वयंघोषित करुन घ्यावी:- त्यांची आरोग्याची स्थिती, आरोग्य सेतू अॅप वरील तपासणी अहवाल, तसेच अलीकडील आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य प्रवासाची माहिती घेण्यात यावी. तसेच स्थानिक प्रशासनाकडून राज्य व जिल्हा helpline तसेच जवळील कोविड सेंटर बद्दलची माहिती घेण्यात यावी.
6) पालकांची संमती:– विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल, शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी.आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहुन देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी.
गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी व नगरपालिका क्षेत्र यांनी करावयाची कार्यवाही –
शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल positive असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल negative आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-१९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड-१९ बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी.
विस्तार अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी करावयाची कार्यवाही –
विशिष्ट जबाबदाऱ्यांसहित विविध कार्यगट गठित करावे जसे आपत्कालीन गट, स्वच्छता पर्यवेक्षण गट, इत्यादी. शिक्षक, विद्यार्थी व इतर भागधारक या गटांचे सभासद म्हणून सहकार्याने काम करतील. परिपाठ, स्नेह संम्मेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमती वर अवलंबून असेल. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात यावी. शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.