वऱ्हाड दूत विशेष
भारत विद्यालयाची १९९५ ची बैच. दहावीनंतर वाटा वेगळ्या झाल्या. प्रत्येकजण करिअर, नोकरी, लग्न, प्रपंचात गुंतले. अभावानेच भेटी व्हायच्या. संपर्क कमी झाला. काहींचे मोबाईलवर बोलणे होत असेल कदाचित. वर्षभराआधी एक व्हाटसअप ग्रुप तयार झाला. ११९५ पासून दुरावलेले मित्र पुन्हा जवळ आले. आपण भेटुया असा विचार पुढे आला. जमेल त्याने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. बुलडाणा भेटीचे ठिकाण ठरले. तब्बल २५ वर्षांनी शुक्रवारी २० नोव्हेम्बर रोजी बुलडाणा रेसीडेंसीत मित्रांचा गोतावळा जमला.
कशी आहेस, कसा आहेस, मला ओळखले का, कुठे आहे, जॉब काय, मुले किती, कोणत्या वर्गात शिकतात असे प्रश्न विचारुन झाले. २५ वर्षांच्या कालावधीत बरेच बदल झाले होते. विचारपुस झाली, गप्पा झाल्या. गरमागरम चहा, नास्ता घेऊन राजूर घाटात भ्रमंतीसाठी बाहेर पडलो. निसर्गरम्य वातावरण, ऊंच टेकडयावर मस्त फोटोशूट केले. भूक लागल्यावर पाय आपसुक हॉटेलकडे वळले. भरपेट जेवलो. लॉनमधे ग्रुप फोटो काढले. हॉलमधे आल्यावर कुणी गाणे गायले, कुणी कविता ऐकवली, कुणी भावना व्यक्त केल्या. इतक्या वर्षांनी भेटलो तरी अजिबात परकेपण जाणवले नाही. ज्या मुलींना वर्गात कधीच बोललो त्याही अगदी मनमोकळ्या बोलल्या. जसे काही रोज एकमेकांशी बोलत असु. निरोप घेतांना कंठातील स्वर काहीसा जड झाला होता. पुन्हा नक्की भेटुया, असा शब्द देत आम्ही मार्गस्थ झालो…
सोहम घाडगे, बुलडाणा