बुलडाणा: कोरोनामुळे तब्बल 8 महिने बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत; मात्र ग्रामीण भागातील एसटी बसफेऱ्या अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. एसटीने प्रवास करणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसमोर वाहतूक व पासचा प्रश्न उभा असल्याने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. वाहतुकीची व्यवस्था नसेल तर बाहेरगावाहून येणारे विद्यार्थी शाळेत पोचणार कसे, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रात चर्चेत आला आहे.
तब्बल आठ महिने घरात बसलेले विद्यार्थी वारंवार शाळा सुरू होण्याची चौकशी करत होते.
कोरोनाचे सर्व नियम पाळत पालकांच्या संमतीवर शाळा भरविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे शाळेची इमारत, परिसर व वर्गखोल्यांच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुलांना पालकांनी स्वतः वाहनाने शाळा-कॉलेजला आणून सोडायचे आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेचा मार्ग मोकळा झाला असला तरी बाहेरगावच्या, एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न भेडसावत आहे.
मुलांना शाळेत आणून सोडण्यासाठी सर्वच पालकांकडे वाहतुकीच्या सोयी नाहीत आणि ज्यांच्याकडे वाहतुकीची सोय आहे अशा पालकांना विद्यार्थ्यांबरोबर शाळेपर्यंत यावे लागेल व शाळा सुटेपर्यंत थांबावे लागेल. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडणे हा प्रश्न सर्वांनाच त्रासदायक ठरणार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाहेरगावची मुले शाळेत कशी पोचणार, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा 11 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. राज्यात एसटी वाहतूक सुरू झाली असली तरी अजून पूर्ण क्षमतेने ही वाहतूक सुरू झाली नाही.
बस फेऱ्या पूर्ववत हव्यात
ग्रामीण भागातील बहुतांश बस फेऱ्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे सद्यःस्थितीत खेड्यापाड्यातील व वाड्यावस्तीवरील विद्यार्थी शाळेत पोचणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील एसटीच्या बस फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत; अन्यथा शाळा सुरू होऊनसुद्धा वाहतूक व्यवस्था नसल्याने विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होईल.