कोरोनानंतरचे माझे जीवन..

0
313

वऱ्हाड दूत विशेष

कोरोनामुळे धावणारे, पळणारे हे जग, ही माणसं अचानक थांबली.कधी आजपर्यंत विचारही केला नव्हता, अशा गोष्टी घडू लागल्या.सर्व काही शांत व भकास वाटू लागले.हा अनुभव फार नवीन,अनपेक्षित होता.काय चालले आहे ? कधी थांबणार ? उद्या कसे होणार ? असे अनेक प्रश्न मनात घर करू लागले.हे सत्य पचवणे फार कठीण होते.ह्या सर्व प्रश्नांना उत्तर काही मिळत नव्हते. *एकत्र कुटुंब* कोरोनाचे अचानक आलेले हे एक असे संकट होते ज्याची अनामिक भीती वाटू लागली.डॉक्टर, पोलिस, प्रशासन,स्वच्छता कर्मचारी सोडून सर्व व्यक्ती आज घरात होत्या .प्रथमच कुटुंब शरीराने व मनाने एकत्र आले होते.ह्याचा सर्वांना आनंद होता. सुरवातीला हे खूप छान वाटत होते. एक नवीन अनुभव होता जो हवाहवासा वाटत होता. आयुष्यात एवढा निवांतपणा ह्या आधी मी कधीही अनुभवला नव्हता. सतत घड्याळयाच्या काट्यावर चालणारी मी आज शांत होती.कामाचे व्याप खूप वाढले होते . त्यात घर काम करणाऱ्या मावशी ही नाही.धुणी भांडी, स्वयंपाक ,सर्व घरकाम करून खूप दमायला होत होते. हे चक्र काही संपत नव्हते.थोडं बसायला ही वेळ नव्हता. नंतर याची सवय झाली. कामाचे व्यवस्थित नियोजन केले. काही काम वाटून घेतली. मुलांची मदत घेतली. आता मला स्वतःसाठी थोडा वेळ मिळू लागला.ह्या आधी दिवसभर घरातील काम व क्लासेस मध्ये पूर्ण दिवस जात होता. *जीवनात बदल* स्त्री ही स्वतःसाठी कधी जगते ? तिचा वेळ हा कुटुंबासाठी असतो.मात्र आता शाळा नाही, डब्बे नाही जणू वेळ थांबला होता ! सुरवातीला काही दिवस छान वाटले.मात्र नंतर सतत घरात बसून, तीच तीच कामं करून कंटाळा येऊ लागला.काय करावे काही सुचत नव्हते.अशा वेळी आठवण झाली ती माझ्या गुरूंची , देवेंद्रजी भुजबळ सरांची. कोरोनाच्या आधीच काही दिवसांपूर्वी त्यांची ओळख झाली होती ती आमच्या शेजारी असलेल्या आशाताई कुंदप ह्यांच्यामुळे. त्यावेळी असा योग आला होता की ते आमच्या घरी जेवायला आले होते. आमची फारशी ओळख नव्हती. मात्र ते दोघे खूप छान बोलत होते. अनेक गप्पागोष्टी झाल्या. मी लिखाण करते हे त्यांना सांगितले , तेव्हा त्यांनी मला पूर्ण सहकार्याची व मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली .ह्या आधी मी लिहीत होते मात्र वर्षात जेम तेम दहा ते बारा लेख. माझ्या व्यापामुळे फारसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे लिखानाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले.मात्र आज वेळ होता, संधी होती त्याचे सोने करावे हे ठरवले.योग्य वेळी गुरू लाभले होते. ह्या वेळेचा सदुपयोग करावा असा मी निर्णय घेतला व त्या दिशेने वाटचाल सुरू केली.प्रथम त्यांना फोन केला व नंतर व्हाट्सअँपद्वारे त्यांच्या संपर्कात राहिले. *लेखन प्रारंभ* माझा पहिला लेख त्यांना पाठवला. त्यावेळी मला मराठी टायपिंग येत नव्हते.म्हणून आमचे स्नेही विजय पालकर ह्यांनी सुरवातीला दोन तीन लेख टाइप करून दिले. मात्र त्यांना सारखा त्रास द्यावा हे काही पटत नव्हते .त्यामुळे स्वतःच टायपिंग शिकले पाहिजे हे माझ्या गुरूंनी मला सांगितले. तसे प्रयत्न चालू केले. मुलांकडून नवीन गोष्टी व मोबाईलची माहिती घेत गेले. ह्या आधी एवढा मोबाइलचा वापर केला नव्हता. सुरवातीला एखादा लहान लेख टाइप करायला सुद्धा तास दोन तास लागत. बऱ्याच चुका होत. मात्र मी हार मानली नाही.चिकाटी व जिद्द सोडली नाही . माझे प्रयत्न चालूच ठेवले.
माननीय देवेंद्रजी भुजबळ हे अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व,उच्च पदावर मंत्रालयात असलेले माहिती संचालक ,उत्कृष्ट लेखक ज्यांची अनेक प्रेरणादायी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत,त्यांनी दूरदर्शवर अनेक कार्यक्रम केले आहेत, ते एक उत्तम वक्ता आहेत ज्यांची लोकप्रियता परदेशात देखील आहे तसेच ते एक नावाजलेले पत्रकार आहेत. एवढी मोठी प्रसिध्द व्यक्ती असून देखील त्यांचा स्वभाव अतिशय नम्र,कोणताही मोठेपणा नाही,कामातील चिकाटी ,शिस्त व प्रामाणिकपणा आहे.ते अतिशय मनमिळाऊ व सर्वांनाच सहकार्य करणारे , एक सर्व गुण संपन्न व्यक्ती आहेत .सतत कामात व्यस्त असायचे .नुकतेच ते रिटायर झाले होते त्यामुळे आज त्यांच्याकडे थोडा वेळ होता. मला त्यांच्या रूपाने साहित्यिक गुरू लाभले होते. *कोरोनाचा सुकाळ* कोरोनाचा काळ माझ्यासाठी सुकाळच म्हणावा लागेल. कारण सतत कामात व्यस्त असलेली व्यक्ती मला मार्गदर्शन करणार याचा अतिशय आनंद होता.त्यांनी माझ्या सर्व लेखनाचे संपादन केले.मला काही सूचना दिल्या, मोलाचा सल्ला दिला,मार्गदर्शन केले,प्रेरणा दिली, माझ्यातील लेखिकेला जागृत केले.एक नवीन दिशा दाखवली. त्यांच्याकडून मला प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळाली .त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढू लागला.स्वप्नात देखील ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता त्या सत्यात उतरू लागल्या. त्यांची लाख मोलाची साथ, त्यांच्या प्रेमळ धाकामुळे माझ्यातील ‘मी’ ची नव्याने ओळख झाली.तू हे करू शकतेस हा आत्मविश्वास केवळ त्यांच्यामुळेच माझ्यात जागृत झाला.त्यांचा माझ्यावर, माझ्या कामावर पूर्ण विश्वास होता.मग मी मागे वळून पाहिले नाही.घरातील काम व रोज वाचन व लेखन करणे हा त्यांचा सल्ला मी अमलात आणला.वेळेचा खऱ्या अर्थाने वेळेचा सदुपयोग होत गेला. त्यांनी मला फेसबुकवर अकाउंट उघडण्याचा सल्ला दिला. कोणती काळजी घ्यावी हे सांगितले. हळूहळू ह्या गोष्टी अंगवळणी पडत गेल्या. माझी एक लेखिका म्हणून ओळख निर्माण झाली. *बाहेरचं जग* लेखनामुळे घर बसल्या अनेक लोकांशी ओळखी होत गेल्या. त्यामुळे बाहेरचे जग आज मी पाहत होते ,अनुभवत होते.वाचकांच्या उस्फुर्त प्रतिक्रियांमुळे प्रेरणा मिळत गेली. त्यामुळे माझ्या लेखणीला वाव मिळाला .एक अदृश्य शक्ती प्राप्त होऊ लागली.कौतुकाच्या दोन शब्दात किती ताकद असते हे मी स्वतः अनुभवत होते. वर्षानुवर्षे मी जे करू शकले नव्हते ते केवळ काही महिन्यात, ह्या कोरोनाच्या काळात करू शकले.ही वेळ माझ्यासाठी पर्वणीच ठरली.माझ्या गुरूंच्या सहकार्यामुळे माझे लेख अनेक वृत्तपत्रात प्रकाशित होत गेले . त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास अजून वाढू लागला.एवढी मोठी व्यक्ती माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे ,आज त्यांचा अमूल्य वेळ मला देत होती व आजही देत आहे. हे खरे तर माझे नशीब म्हणावे लागेल.केवळ गुरुच आपल्या शिष्याला योग्य अयोग्य सांगू शकतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपले भविष्य उज्वल होऊ शकते.प्रत्येकाच्या आयुष्यात असे गुरू असतात असे नाही. मात्र मी खूप भाग्यवान आहे असे म्हणायला काही हरकत नाही. *विविध उपक्रम* कोरोनाच्या अगदी सुरवातीच्या दिवसात सर्व महिला घरातील तीच तीच कामं रोज करून व सतत घरात बसून वैतागल्या होत्या. त्यावेळी आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे मनोमन वाटले. मग माझ्या लेखणीद्वारे अनेक उपक्रम राबवले. जवळ जवळ असे १२ उपक्रम पंधरा दिवस चालू होते. व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे नियोजन आखले.माझ्या कल्पनेला माझ्या अनेक मैत्रिणींची साथ लाभली. मला त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या प्रेरणादायी शब्दातुन हे उपक्रम राबविण्यात मदत व प्रोत्साहन मिळाले. प्रथम उपक्रमात सर्व कोरोना योद्धासाठी विश्व प्रार्थना करून त्यांचे आरोग्य व कुटुंबासाठी प्रार्थना केली. नंतर लग्नातील जोडीचा फोटो टाकायला सांगितले. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपल्या आई विषयी लिहायला सांगितले. सर्व मैत्रिणींना भरून आले. सर्व भावनाविवश झाल्या अनेकींचे डोळे पाणावले व आईबरोबरचा फोटो शेअर केल्यामुळे त्यांना मनोमन आनंद मिळाला.नंतर एका उपक्रमात मैत्री दिवस साजरा केला. मैत्रिणींबरोबरचे फोटो पाहिल्यावर गृपवर उत्साही व आनंदी वातावरण तयार झाले. पुढील उपक्रमात स्वतःचे नऊवारीतील फोटो टाकायला सांगितले. त्यामुळे आपले सण व आपल्या परंपरा किती छान व आनंद देणाऱ्या आहेत याची प्रचिती सर्वांनी अनुभवली.आपल्या सासरबद्दल लिहायला सुचवले .त्यामुळे सासरची मंडळी देखील खुश झाली. सासू सुनेचे नाते,जावा जावांचे नाते फुलले. गाण्याच्या भेंड्या देखील खेळल्यात. त्या दिवशी तर आनंदाला उधाण आले होते. असे वाटत होते की आमच्या गृपला कोणाचीही दृष्ट लागू नये.गृप तयार करणाऱ्या ऍडमिंन , सौ विशाखा खुटाळे हिचे देखील कौतुक करायला सुचवले .कारण तिच्यामुळेच आज आम्ही जोडल्या गेलो होतो. सुख दुःखात वाटेकरी होत होतो. हे आनंदाचे क्षण अनुभवत होतो. हे केवळ तिच्यामुळेच शक्य झाले होते. त्यामुळे ऍडमिन जाम खुश झाल्या. आमच्या गृपमधील सर्वात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई कुंदप त्यांच्याबद्दल देखील लिहायला सुचवले .सर्वानीच भरभरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या . ह्या अनेक उपक्रमांद्वारे मैत्रिणींना लिहिते व बोलते केले. सर्व जणी खूप खुश होत्या.नंतर एका उपक्रमात पुरुष वर्गाला विनंती केली की त्यांनी आपल्या पत्नीबद्दल मनातील विचार मांडावे,तिने आजपर्यंत तुमहाला दिलेली साथ , तिचा संघर्ष सांगावा,तिच्या चांगल्या गुणांचे वर्णन करावे आणि आश्चर्य म्हणजे ही कल्पना त्या सर्वांना अतिशय आवडली. जवळजवळ ४५ पुरुषांनी आपल्या प्रतिक्रिया लेखणीद्वारे व्यक्त केल्या . उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. खरे तर मला एवढी अपेक्षा नव्हती. कारण हे एक सरप्राइज होते माझ्या प्रेमळ मैत्रिणींसाठी. ज्याची कल्पना त्यांनी कधीच केली नव्हती . पुरुष मंडळींना नम्र विनंती केली होती की त्यांनी ही गोष्ट त्यांना सांगू नये व व्हाट्सएपच्याद्वारे मला त्यांचं लेखन पाठवलं. दुसऱ्या दिवशी सर्व मैत्रिणींसाठी हा एक सुखद धक्का होता जो त्यांना अतिशय आवडला. त्या सर्व जणी खूप खुश होत्या. आज माझ्या उपक्रमाचा हेतू खऱ्या आर्थाने पूर्ण झाला होता ‘ आनंद द्या व आनंद घ्या’ हा एकमेव प्रामाणिक उद्देश यशस्वी झाला. उपक्रमाचा शेवटी मैत्रिणींना देखील आपल्या पतीबद्दल लिहायला सांगितले. त्यामुळे शेवट गोड झाला.ह्या सर्व उपक्रमांमुळे सर्व नाती पुन्हा नव्यावे जोडली गेली, बहरली ,प्रेम वाढले अजून काय पाहिजे होते ? घरात राहून देखील एकत्र असल्याची जाणीव निर्माण झाली. सर्वांच्या भावना अनावर झाल्या होत्या. जणू सर्वाना भेटायची सवय झाली होती. रोज आज कोणता उपक्रम असेल बरं ? ही उत्सुकता सर्वानाच असायची .ह्या उपक्रमांमुळे कोरोनाची मरगळ थोडी कमी झाली होती.सर्व मैत्रिणींना एकत्र जोडण्याचा हेतू सफल झाला होता ह्या उपक्रमांमुळे माझी वेगळी ओळख झाली होती .सर्वच खूप खुश झाले होते.त्यांनी माझे मनापासून आभार मानले .हे पंधरा दिवस खूप मजेत व आनंदात गेले.
*नवी ओळख* कोरोनानंतर माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले . माझ्या जीवनाला गती प्राप्त झाली. माझी नवीन ओळख निर्माण झाली. मला नवीन धैर्य मिळाले .आयुष्य खूप सुंदर आहे ह्याची ही प्रचिती होती जणू.माझे समाधान व आनंद हे माझ्या लिखाणात आहे हे जाणवले.लेख प्रकाशित झाला की त्यावरील स्वतःचे नाव पाहून डोळे पाणावत. डोळ्यात आनंदाश्रू तरंगत.मी स्वतःला सिद्ध करू शकले ह्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही. *कोविड योद्धा पुरस्कार* माझ्या सततच्या सकारात्मक लेखनामुळे मला काही कोविड योध्दा पुरस्कार मिळाले. ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. त्यावेळी मी निशब्द होते. *आत्म कथन* “बंदिस्त पान” म्हणून माझे आत्मकथन लिहिण्यास चार महिन्यापासून सुरवात केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही कल्पना माझ्या गुरूंनी मला दिली. त्यामुळे माझ्या आठवणींना उजाळा मिळाला.बंदिस्त पानमुळे आज अनेक दुरावलेली मनं पुन्हा जुळलीत. जुने विसरून नव्याने सुरवात केली .अनेक वर्षाने आम्ही सर्व मामे भाऊ, मावस बहिणी, चुलत भाऊ ,त्यांचे कुटुंब पुनः जोडल्या गेलो. एकमेकांच्या संपर्कात आलो. पंधरा वर्षांनी पुन्हा भेटी झाल्या. भावना अनावर झाल्या. पुन्हा आपलेपणाची जाणीव निर्माण झाली हे खरंच आश्चर्य आहे. लिखाणात,आपल्या नम्रपणात एवढी ताकद असू शकते याची ही पोच पावती आहे.नव्याने सुरवात करायला वयाचे बंधन नसते मात्र प्रामाणिकपणे काम केले तर अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात हे सिद्ध झाले होते.आपले छंद व कला जपायला व जोपासायला पाहिजेत हे कोरोनाने मला शिकवले.
आज मी जे काही करू शकले , एक लेखिका म्हणून ओळख निर्माण करू शकले ते केवळ आणि केवळ माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळेच हे आवर्जून सांगावसे वाटते.त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो त्यांची कायम अशीच साथ मला मिळो हीच एकमेव इच्छा आहे.त्यांच्याकडून शिकण्यासारखे एवढे आहे की हे आयुष्य अपुरे पडेल.
सूर्याची सोनेरी किरणे जर सृष्टीवर पडली की सर्व सृष्टी उजळून निघते त्याचप्रमाणे असे गुरू जर प्रत्येक व्यक्तीला लाभले तर त्यांचे आयुष्य उजळेल, त्यांना योग्य दिशा मिळेल. मनात आशेची ज्योत निर्माण होऊन त्यांची प्रगती होईल ह्यात तिळमात्र शंका नाही.

लेखन : रश्मी हेडे

Previous articleशिवसेना जिल्हा प्रवक्तापदी पत्रकार गजानन धांडे
Next articleइयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here