मंगेश फरपट |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिद्द, कष्ट व उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे सुनील शेळके यांनी प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून शासनाने त्यांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली. युवकांनी त्यांची प्रेरणा घेऊन स्पर्धा परिक्षेची तयारी करावी, असे आवाहन बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.
उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल सुनील शेळके यांचा डोंगरखंडाळा ग्रामस्थांच्या वतीने रविवारी( ता.१५) नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री.चांडक बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक विक्रीकर आयुक्त श्रीकृष्ण टेकाळे, उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांची मंचावर उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देतांना सुनील शेळके म्हणाले की, डोंगरखंडाळा येथे मी लहानाचा मोठा झालो. इथल्या शाळेत शिकलो. गावच्या मातीतील जिद्द, चिकाटी या गुणामुळे जीवनात यश मिळवता आले. ग्रामस्थानी केलेला माझा सत्कार हा घरचा आणि भावनिक सत्कार आहे. यावेळी त्यांनी युवकांना मार्गदर्शनही केले. श्रीकृष्ण टेकाळे यांनी सुनील शेळके हे शांत, संयमी व आदर्श अधिकारी असल्याचे सांगितले. डोंगरखंडाळा गावचे पाणी वेगळेच आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून देशातच नाही तर जगात ओळख असलेले राधेश्याम चांडक तसेच सिद्धार्थ भंडारे, सुनील शेळके यांच्या रूपाने दोन उपजिल्हाधिकारी व अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर येथे घडल्याचे राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार राजर्षी शाहू फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शैलेशकुमार काकडे यांनी केले . यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.