वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: वनपरिक्षेत्रात गेल्या 8 महिन्यात 7 व्यक्ती वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. मात्र वनविभागाकडे निधी नसल्याने आपतग्रस्तांना अर्थसहाय्य मिळू शकले नसल्याची वास्तविकता आहे.
दिवसेंदिवस वन्यप्राण्यांकडून मानवावर हल्ला होण्याच्या घटनात वाढ झाली आहे. शेतात किंवा रस्त्याने जाणा-या नागरिकांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यानंतर संबधित जखमी व्यक्तीला शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. शासकिय रुग्णालयात उपचार घेतला तर अर्थसहाय्य मिळत नाही पण खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास झालेल्या खर्चास जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मान्यता मिळाल्यानंतर संबधित व्यक्तीला 1 लाख 25 हजार रुपयापर्यंत मदत दिली जाते. अकोला जिल्ह्यात वाघ, बिबट हे प्राणी नाहीत. मात्र रानडुकर, माकड व रोहीच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. यापैकी ज्या व्यक्तींनी वनविभागाकडे माहिती दिली. त्या व्यक्ती अर्थसहाय्यासाठी प्राप्त झाले आहेत. मात्र वनविभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने 7 व्यक्ती मदतीपासून वंचित राहीले आहेत.
सामाजिक संघटनांचा पुढाकार
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची माहिती 48 तासाच्या आत वनविभागाकडे द्यावी लागते. त्यानंतर एखादी घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी जखमींचे बयाण नोंदवतात खरे. पण प्रत्यक्ष मदत तत्काळ मिळू शकत नाही. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मंजूरीशिवाय अशा व्यक्ती मदतीसाठी पात्र होत नाहीत. अशापरिस्थितीत संबधित व्यक्तीला तत्काळ मदत देण्यासाठी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी पुढाकार घेतात. जखमी व्यक्तीला एका दिवसात मदत मिळाल्यास अशा व्यक्तीला उपचारासाठी अर्थसहाय्य होवू शकते अशाप्रकारची अपेक्षा व्यक्त होत आहे.