विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास दंडात्मक कारवाई
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केल्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांना हेल्मेटसक्ती चा निर्णय पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी घेतला आहे.
अकोला जिल्ह्यातील प्राणांतिक अपघात रोखून अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून येत्या शुक्रवार पासून सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले, अकोला जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अपघातात नागरिकांचा हकनाक बळी जातो त्या पैकी 80 टक्के मृत्यू हे डोक्यावर जबर दुखापत लागल्यानेच होत असल्याचे दिसून येते, अश्या वेळी हेल्मेट परिधान केल्यास जीव वाचू शकतो, अश्यातच मा सर्वोच्च न्यायालय ह्यांनी दरवर्षी 10 टक्के अपघातात कमी करण्याचे निर्देश परिवहन मंत्रालय ह्यांना दिले असून प्राणांतिक अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट दिल्याने त्या अनुषणगाने उपाय योजण्याच्या सूचना सर्व संबधितांना देण्यात आल्या आहेत.
सर्वसामान्य दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे, विना हेल्मेट चालकांवर येत्या शुक्रवार पासून शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई सुरू करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिली असून सर्व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन केले आहे.