मलकापूर : एसटी कामगारांचे थकित वेतन, भत्ते दिवाळीपुर्वी अदा करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कोरोनामुळे एसटी कामगार, त्यांचे कुटूंब आर्थिक संकटात आहे. ही बाब लक्षात घेता राज्यशासनाने ठोस पाऊले ऊचलणे गरजेचे आहे, या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष हरी माळी, प्रदेश सचिव प्रदिप गायकी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांना दिले. एसटी कामगारांना ऑगष्ट, सप्टेंबरचे थकित तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन एकत्रितपणे दिवाळीपुर्वी द्यावे. यासोबतच दिवाळीपुर्वी अग्रिम, दिवाळी भेट तसेच डिसेंबर २०१९ पासून केंद्र, राज्य शासन कर्मचा-यांना लागू केलेला ५ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह दिवाळीपुर्वी देण्यात यावा. लॉकडाउन काळातील एसटी कामगारांचे वीज बिल माफ करावे, एसटी कामगारांचे कर्ज माफ करावे, इतर कोणत्याही कपाती करू नये, मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, स्वेच्छा निवृत्ती घेणा-या एसटी कामगारांच्या मुलाला एसटीमध्ये नोकरी द्यावी, सेवानिवृत्त कामगारांना अंतिम देयके वेळेवर द्यावीत यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनाची दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.