खामगाव: राज्य सरकारने देऊ केलेल्या मदतीत भेदभाव केला जात असून अनेक शेतक-यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. तरी संपूर्ण खामगाव तालुक्याचा अतिवृष्टी मध्ये समावेश करून प्रत्येक शेतक-यांना सरसकट मदत देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी भाजपच्या वतीने येथील एसडीओ कार्यालया समोर आंदोलन करून निवेदन देण्यात येणार आहे.
अतिवृष्टीमुळे खामगाव तालुक्यात खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला नगदी पीक असलेले उडीद मूग पावसाने गमविले, त्यानंतर तिळाचे नुकसान केले आणि परतीच्या मुसळधार पावसाने प्रमुख पीक असणारे सोयाबीनचे अतोनात नुकसान केले. कपाशीचे देखील प्रचंड नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिल झालेले आहेत. अशी सर्व भीषण परिस्थिती असतानाही खामगाव तालुका अतिवृष्टीतून वगळण्यात आला असून केवळ तालुक्यातील 1915 शेतक-यांचा नुकसानग्रस्तच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील 90 टक्के शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. हा शेतक-यांवर अन्याय असून याविरोधात शेतक-यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. संपूर्ण खामगाव तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करून सर्व शेतक-यांना मदत देण्यात यावी तसेच शेतक-यांना पीक विमा मिळावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने आमदार अॅड.आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार 2 नोव्हेंबर रोजी येथील एसडीआे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात
भाजपचे खामगाव शहर व तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, दोन्ही मंडळातील पदाधिकारी, जिल्हापदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, भाजयुमो, महिला आघाडी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी शेतक-यांनी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ व शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांनी केले आहे.