श्रीराज पाटील | वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: सध्या सर्वत्र माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभाव असून या माध्यमाने संपूर्ण जगच जवळ आल्याचे जाणवत आहे, माहिती-तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात प्रभावी वापर झाल्यास शेतीमधील संभाव्य नुकसान टाळता येतील, जमिनीच्या मशागतीपासून तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठापर्यंत सर्वच माहिती उपलब्ध होत त्याच्या वापराने अन्नदाता खऱ्या अर्थाने सुखी होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना.उद्धव ठाकरे यांनी केले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या 48 व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कृषी विद्यापीठांनी शेती विषयक शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात आपले भरीव योगदान देत शेती क्षेत्राला आधुनिकतेची जोड दिलीअसून शेतीचे शिक्षण घेतलेल्या पदविधरांनी शेती विकासात आपले योगदान दिल्यास अन्नदाता सुखी होईल असे सांगतानाच कोरोना महामारीच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्र बंद होते किंवा घरून काम करत होते मात्र शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतीमध्ये राबराब राबत आम्हाला अन्न धान्य, फळे, भाजीपाला, दूध आदी वेळेत उपलब्ध करून देत देवरूपाने सेवारत होते असे गौरवोद्गारही मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात काढले. विकेल ते पिकेल हे महाराष्ट्र राज्याचे धोरण प्रत्यक्ष कृतीत आणतांना येणारे अडथळे सर्व मिळून दूर करू या असे प्रतिपादन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
जॉईंट ऍग्रोस्को हा कृषी क्षेत्रातील महामेळावा असून शेतीतील संशोधन व त्यावर आधारित उद्योग राज्याला प्रगतिपथावर नेणारे ठरतील व पर्यायाने शेती शाश्वत होईल असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री शिक्षण, माहिती व दूरसंचार मा. ना. संजय धोत्रे यांनी केले.
देशपातळीवरील कृषी क्षेत्राला समर्पित पहिले सेंटर फॉर एक्सलन्स डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्थापन करण्यात येत असून “परम शावक सुपर कम्प्युटर” चा शेती संशोधनात प्रभावी वापर व्हावा असा आशावादही ना. धोत्रे यांनी आपल्या संबोधनात व्यक्त केला. तर प्रत्येक संशोधन शेतकऱ्यांपर्यन्त पोहचणे गरजेचे असून अधिकाअधिक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
राज्यातील शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्वांगीन प्रयत्नांची गरज सुद्धा ना. दादाजी भुसे यांनी याप्रसंगी व्यक्त केली प्रयोगशील शेतकऱ्यांचा कृषी संशोधनात सहभाग वाढवत शेतकरीभिमुख संशोधन करता येईल असे सांगताना शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाची निर्मिती करणे हा राज्य शासनाचा उद्देश आहे असेही कृषिमंत्री आपल्या उद्बोधनात म्हणाले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू मा. डॉ. व्ही. एम भाले यांनी आपल्या प्रास्ताविकात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संशोधन आणि विस्तार विषयक कार्याचा संक्षिप्त अहवाल सादर करीत केंद्र तथा राज्य शासनाच्या सहयोगातून कृषी विद्यापीठे प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन केले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात द्वारे गत पाच दशकात निर्मित सुधारित पीक वाणे यंत्रे अवजारे तथा शिफारशींचा विशेष उल्लेख करताना स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी मिनी दाल मिल, भुईमुगाचे TAG24 वाण, तूर पिकाचे पीकेव्ही तारा तर उडीद पिकाची TAU 9 जात राष्ट्रीय पातळीवर नामांकित असल्याचा उल्लेख केला व तेलबिया पिकांना अधिक प्रोत्साहन देत गावपातळीवरच मिनी ऑइल मिल स्थापित होत तेल निर्मिती झाल्यास ग्रामीण भागाचे सक्षमीकरणाला हातभार लागेल असे प्रतिपादन केले यावर्षी चारही कृषी विद्यापीठांमधून एकूण 208 शिफारसी या बैठकीमध्ये सादर होणार आहेत यामध्ये 16 पिक वाण, 12 यंत्रे व अवजारे तर 180 पिक उत्पादन तंत्रज्ञान यांचा समावेश असल्याचे सुद्धा डॉ. भाले यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले .
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा. ना. श्री संदिपान भुमरे यांची विशेष उपस्थितीसह अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार राज्यमंत्री माननीय ना. श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, महाराष्ट्र राज्याचे सहकार,कृषी, सामाजिक न्याय, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास औकाफ व मराठी भाषा राज्य मंत्री मा. ना.श्री विश्वजीत कदम आणि राज्याच्या फलोत्पादन, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क व राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री मा. ना. आदिती तटकरे ,महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव माननीय श्री एकनाथ डवले आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे महासंचालक मा. श्री.विश्वजीत माने यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महत्त्वाकांक्षी संशोधनात्मक बैठकीचे प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरू सर्वश्री मा.डॉ. के. पी. विश्वनाथा, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, मा. डॉ. ए. एस. ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तथा मा.डॉ. एस डी सावंत कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचेसह राज्यातील माननीय आमदार, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य व इतर लोकप्रतिनिधी, सर्वच कृषी विद्यापीठचे संचालक, अधिष्ठाता,सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख विशेषत्वाने उपस्थित होते. बैठकीची सुरुवात कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने झाली याप्रसंगी राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधकाने द्वारे लिखित विविध विषयांवरील सोळा पुस्तकांचे विमोचाना सुद्धा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्धाटन सत्राचे सूत्र संचालन डॉ. पं दे कृ वि अकोलाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन यजमान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे चे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर तथा यजमान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे यांचेसह सर्व संचालक, कुलसचिव आणि बैठकीचे यशस्वितेसाठी गठित विविध समिती अध्यक्ष, सहअध्यक्ष, सचिव तथा सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.