वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : काळानुरूप शेतीपद्धतीत बदलाची गरज आहे. उत्पादन खर्च कमी असणाऱ्या शेती पद्धतीचा आदर्श विनोद इंगोले यांनी घालून दिला आहे. त्यांची प्रयोगशीलता अनुकरणीय असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्काराने इंगोले यांना शेतीमधील प्रयोगशीलता व विस्तार कार्यासाठी गौरविण्यात आले. त्याची दखल घेत यवतमाळमध्ये विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचा सन्मान केला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. किसान काँग्रेसचे देवानंद पवार, श्याम पांडे व विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. नाना पटोले म्हणाले, शेती फायद्याची होण्यासाठी आधी उत्पादकता खर्च कमी केला पाहिजे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात रासायनिक घटकांवरील अवलंबिता कमी करण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या शेती पद्धतीचे नियोजन धाकली येथील शेतकरी विनोद इंगोले यांनी केले आहे. नैसर्गिक घटकांचा वापर शेतीमध्ये वाढवीत त्याआधारे शेतमाल उत्पादन घेण्यावर त्यांचा भर राहिला आहे. त्यांची ही प्रयोगशीलता इतरांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. सिंचन सुविधा बळकटीकरणासाठी त्यांनी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रकल्पापासून शेतापर्यंत पाईपलाईन टाकली. एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा त्याकरिता कृषी ग्रंथालयाची उभारणी, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवरील कार्यशाळांसाठी पुढाकार घेतला. गावपातळीवर जनावरांचे आरोग्य जपले जावे याकरिता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या सहकार्याने पशू चिकित्सा शिबिराचे आयोजन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात त्यांचे सातत्य आहे. धाकली व निंभारा येथे अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून त्यांनी सेवाभावही जपला आहे. यावेळी शेतीक्षेत्रातील प्रयोगशीलता, कृषि विस्तार व सामाजिक कार्याची दखल घेत विनोद इंगोले यांचा शाल व श्रीफळ देत गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन देवानंद पवार यांनी केले.