वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होईल असे जाहिर केले आहे. जर दसरा मेळावा होत असेल तर अकोल्यात सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा होईलच अशी भूमिका भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने घेण्यात आली आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा दरवर्षी अकोल्यात साजरा होत असतो. यानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाची संयुक्त बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पी.जे.वानखडे, सरचिटणीस प्रा.डा. एम.आर.इंगळे, विजय जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाठ, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्रमोद देंडवे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या आयोजनाबाबत भूमिका मांडली. यानंतर ज्येष्ठ पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन शिराळे तर आभार भाऊसाहेब थोरात यांनी मानले.
पोलिसांनी नाकारली मिरवणूक व सभेची परवानगी!
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. यासंदर्भात नियोजन झाले आहे. जर मुंबईत शिवसेनेच्या वतीने दसरा मेळावा होणार असेल तर भारतीय बौद्ध महासभा देखील अकोल्यात नेहमीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा करेल. त्यानिमित्त 26 ऑक्टोबररोजी दुपारी भव्य मिरवणूक आणि जाहिर सभा सायंकाळी 6 वाजता संपन्न होईल. यासाठी रितसर परवानगी देण्यात यावी, या आशयाचे निवेदन पोलिस अधिक्षकांना देण्यात आले आहे. मात्र सध्या कोविड -19 चा प्रादुर्भाव असल्याने 25 व 26 ऑक्टोबररोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक किंवा सभा घेता येणार नाही. तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल अशाप्रकारची नोटीस भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पी.जे.वानखडे यांच्यासह डॉ. एम.आर.इंगळे, गजानन थोरात, विश्वास बोराडे, रमेश गवई, डि.बी.शेगावकर, राजेंद्र पातोडे यांना खदान पोलिसांनी कलम 149 सीआरपीसी प्रमाणे बजावली आहे.