चिखली . “सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा” उपक्रमाअंतर्गत आ. सौ.श्वेताताई महाले यांनी नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला तालुक्यातील माळशेंबा येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष सौ. मंदाताताई दत्ता मैंद यांचा गौरव केला. सौ. मंदाताई मैंद यांनी आपल्या गावाला संपुर्ण दारुमुक्त केले आहे.
माळशेंबा या गावातील असंख्य नागरिक दारुच्या आहारी गेले होते. दारूसाठी भांडणे ही बाब माळशेंबा येथे नित्याचीच झाली होती. तत्कालीन पोलीस पाटील यांचा दारू विक्रेत्यांना पाठिंबा असल्याचे कारण समोर करीत त्यांना पदावरून पायउतार करण्यासाठी सौ. मंदा दत्ता मैंद यांच्या नेतृत्वात गावातील महिला एकवटल्या. कोणत्याही परिस्थितीत गावाला दारू मुक्त करायचेच हा ध्यास मंदाताईंनी घेतला. महिलांच्या या एकजुटीमुळे गावातील अवैध दारू विक्रेत्यांचे अड्डे उध्वस्त झाले. आणि बघता बघता गाव दारू मुक्त झाले. त्यावेळेस पासून सौ मंदा ताई दत्ता मैन्द या माळशेंबा गावाच्या तंटामुक्ती अध्यक्ष आहेत . सलग ३ वेळेस माळशेंबा तंटामुक्ती अध्यक्षपद भूषवून कायमची दारूबंदी केल्याने अनेक तरुण व्यसनमुक्त झाले. गावातील १०० % महिलांचा व पुरुषांचा पाठींबा त्यांना मिळतो. गावातील कोणताही वाद गावातच संपविण्याचा प्रयत्न करतात. पोलीस स्टेशनची गरज भासू देत नाही. अशा जिगरबाज, गावाला दारू मुक्त करणाऱ्या सौ. मंदाताईंचा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी साडी चोळी, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला सन्मान केला. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. सिंधुताई तायडे, जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई शिनगारे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, उपसभापती शमशाद पटेल, पंचायत समिती सदस्य सौ. मनिषाताई सपकाळ, अशोक पाटील, अरुण पाटील, रितेश पवार, सतीश पाटील, राजू लोखंडे, अतुल देशमुख, सौ. आशाबाई देशमुख, सौ. गौकर्णा डहाके, सौ. लताबाई कारले, सौ. नर्मदाबाई पाटील, सौ. पार्वतीबाई कारले, सौ. शारदाताई पाटील, विशाल कोल्हे, दत्ता देशमाने आदी उपस्थित होते.