अकोला :‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’, या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृतीच्या उद्देशाने लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेली १८ वर्षावरील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकेल. या स्पर्धेत सहभागासाठी आपली प्रवेशिका सॉफ्ट कॉपी शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२० सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, अकोला यांच्या dioakola@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी पाठवावयाच्या प्रवेशिका तीन ते सात मिनीटे कालावधीचा लघुपट डिजीटल फॉर्मेट (Mpeg4) मध्ये पाठवाव्या. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये, तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये असे देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठीची नियमावलीः-
१) स्पर्धेसाठी सादर होत असलेली कलाकृती ही कथापट या स्वरुपातील असावी.
२) लघुपटाचा कालावधी तीन ते सात मिनीटांचाच असावा. अधिक वा कमी कालावधी असल्यास प्रवेशिका बाद ठरवली जाईल.
३) कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी व त्याअनुषंगाने मानवी जीवनाशी निगडीत प्रसंग, कुटूंबाची, कुटूंबातील व्यक्तींची जबाबदारी आणि कोरोनाच्या संसर्गासाठी शासनस्तरावर होत असलेले प्रयत्न याचे चित्रण असणे अपेक्षित आहे.
४) कलाकृतीतून कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्याबाबतच्या उपाययोजना, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांचे
मनोबल उंचावणारे संदेश सुस्पष्टरितीने दिले जाणे आवश्यक आहे.
५) जनजागृतीपर गितांचे व्हिडीओ स्पर्धेसाठी अपात्र मानले जातील.
६) स्पर्धेत प्रवेशिकेसोबत स्पर्धकाने आपली कलाकृती ही मूळ आपलीच असल्याबाबतचे आपल्या स्वाक्षरीचे स्वयं प्रकटन देणे आवश्यक आहे. (पीडीएफ स्वरुपात)
७) कलाकृतीतील कलावंत, तंत्रज्ञ यांची श्रेयनामावली देणेही आवश्यक आहे.
८) स्पर्धक अकोला जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
९) अन्य जिल्ह्यातील वा अन्य स्पर्धांमध्ये सहभागी असलेली कलाकृती या स्पर्धेसाठी सादर करता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास प्रवेशिका बाद ठरवली जाईल.
१०) या स्पर्धेचे संयोजन समितीतील, निवड समितीतील व्यक्ती, त्यांच्या संबंधित विभागांच्या कार्यालयांचे कर्मचारी- अधिकारी यांना मात्र स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
११) विजेत्या ठरलेल्या कलाकृती ह्या नंतर शासनाच्या मालकीच्या राहतील.
१२) विजेत्यांना शासनाने निर्धारित केलेल्या पारितोषिका व्यतिरिक्त कोणत्याही स्वरुपात मोबदला दिला जाणार नाही.
या स्पर्धेतून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत व माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेची जनजागृती करणे हा उद्देश असून नागरिकांनी आपापल्या संकल्पनांना प्रत्यक्ष चित्रण करुन लघुपट तयार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.