बुलडाणा: देऊळगांव राजा येथील बालाजी महाराज वार्षिक उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र कोविड 19 या साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात देऊळगांव राजा येथील बालाजी महाराज वार्षिक उत्सवात 24 ऑक्टोंबर रोजी साजरा होणारा मंडपोत्सव, 3 नोव्हेंबर रोजी असणारा लळीत उत्सवाला परवानगी देण्यात आलेली नाही. बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 4 अन्वये जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहण्यासाठी वरील उत्सवांना परवानगी नाकारली आहे.
तसेच मंदीराच्या आतील कार्यक्रमास जास्तीत जास्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत दि. 25 ऑक्टोंबर रोजी दसरा पालखी मिरवणूक प्रतिकात्मक स्वरूपात करण्याची परवानगी दिलेली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जास्तीत जास्त 10 व्यक्ती / खांदेकरी सोशल डिस्टसिंग व मास्क वापरून राहतील. गर्दी होणार नाही तसेच खांदेकरी यांची कोविड 19 ची तपासणी करण्यात येईल, अशा हमीपत्रावर पालखी मिरवणूकीस परवानगी देण्यात येत आहे. पालखीचा मार्ग केवळ मंदीर परीसर (गरूड मुर्ती ते हनुमान मुर्तीपर्यंतचा भाग) इतकाच मर्यादीत राहील. सदर मिरवणूकीदरम्यान भाविक दर्शनासाठी गर्दी करणार नाहीत, तसेच मिरवणूकीमध्ये सहभागी होणार नाही, याबाबतची सर्वतोपरी दक्षता घेण्याची जबाबदारी आयोजक संस्थानची असणार आहे.
तसेच दि. 16 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या कार्तिक उत्सवास मंदीराच्या अंतर्गत भागात जास्तीत जास्त 10 भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे. थर्मल स्क्रीनींगद्वारे तपासणी करूनच उत्सवात प्रवेश देण्यात यावा. मंदीराचा परीसर वारंवार निर्जंतुकीकरण करावा. मंदीरातील पुजारी व संस्थानचे कर्मचारी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकाकर राहील. मंदीर परीसरात हात धुण्यासाठी पुरेशी व्यवस्था असावी. सदर उत्सवादरम्यान कोविड आजारावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मंदीर परीसरात गर्दी होणार नाही, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, मास्क न वापरल्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करणे याबाबतची सर्व जबाबदारी नगर परिषद व पोलीस विभागाची असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
- कोविड संसर्गामुळे निर्णय
- मंदीराच्या अंतर्गत भागात 10 भाविकांच्या उपस्थितीत कार्तिक उत्सवास परवानगी