वऱ्हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : शासकीय जागृती महिला राजगृहातून ६ मुलींनी रात्रीच्या सुमारास सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना खदान पलिस स्टेशन हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली असून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील खडकी परिसरात महिला व बाल विकास विभागाचे शासकीय जागृती महिला राजगृह आहे. या ठिकाणी हरवलेल्या व ज्यांना पारिवारिक आधार नाही अशा मुलींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येते. याच ठिकाणी राहणाऱ्या अंदाजे १८ ते २४ वयोगटातील ६ मुलींनी १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर २ ते ३ वाजताच्या दरम्यान पलायन केले. विशेष म्हणजे या सहा ही मुलींनी शासकीय जागृती महिला राजगृहच्या दुसऱ्या मजल्यावर साडी बांधून सिनेस्टाईल पलायन केल्याचे समजते. या प्रकाराबाबत शासकीय जागृती महिला राजगृह येथील अधीक्षकांनी खदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून खदान पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. खदान पोलिस सध्या सहा ही मुलींचा त्यांच्या छायाचित्र वरुन शोध घेत आहे.