पुणे: कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि, ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यात यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवावा. मृत्यूदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाकाळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनानी सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.