दीनदयाल रुग्ण सेवेद्वारे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचे कार्य: महापौर संदीप जोशी

0
419

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

नागपूर: समाजातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यात येत आहे. मात्र अनेकदा अपुऱ्या उपकरणांचा अभाव, आवश्यक साहित्य नसणे यामुळे रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतो. मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये जाण्याची ऐपत नसल्याने अनेकांना जीवही गमवावा लागतो. ही वेळ कुणावरही येउ नये, प्रत्येकाला वेळेत योग्य उपचार मिळावा. त्यासाठी अडसर ठरणाऱ्या बाबींचे समाधान करण्याकरिता समाजिक दायित्वाच्या भावनेने ‘दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प’ सुरू करण्यात आला. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाद्वारे शासकीय रुग्णालयांना अनेक आवश्यक उपकरणे, वस्तू, साहित्य पुरविण्यात येतात. नागपूर शहरातील विविध खाजगी कंपन्यांच्या ‘सीएसआर’चे सुद्धा यासाठी सहकार्य आहे.

याशिवाय शहरातील प्रत्येक भागात आरोग्य सेवा पोहोचावी, गरजूंना वेळेत उपचार मिळावे. आजाराचे लवकर निदान व्हावे याकरिता ‘चालता-फिरता’ दवाखाना हा सुद्धा महत्वाकांक्षी प्रकल्प महापौर संदीप जोशी यांनी सुरू केला. आज या प्रकल्पाच्या माध्यमातून झोपडपट्टी भागामध्ये नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. शिवाय आवश्यक औषधेही नि:शुल्क देण्यात येत आहे.

उत्तम आरोग्य सेवा मिळविणे हा समाजातील प्रत्येक घटकाचा हक्क आहे. त्यासाठी आपली यंत्रणा कार्यरत आहेच. मात्र या यंत्रणेवरील ताण लक्षात घेता नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळविण्यासाठी आपले छोटेशे सहकार्य मोठी भूमिका बजावू शकते. या हेतूने ‘दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प’ सुरू करण्यात आले आहे. दीन-दलितांची, वंचितांची सेवा करीत राहणे, हाच या सर्व प्रकल्पांमागील उद्देश आहे, अशी भावना महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

Previous articleशिक्षक मतदारसंघ निवडणूक ; आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे: निवडणूक निर्णय अधिकारी पियुष सिंह
Next articleआता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही; घरबसल्या करता येईल नोंद