प्रशांत खंडारे |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णासाठी महत्त्वाचे समजले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी केली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना बुलडाणा येथील शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल एका रुग्णाच्या नातेवाइका कडून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला देण्यासाठी तब्बल 10 हजार रुपये एका कक्ष सेवकाने घेतल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईकांनी केल्याने येथील आरोग्य विभागा हादरुन गेला आहे.ही खळबळजनक घटना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे जिल्हा मुख्यालयी घडली आहे. आरोग्य प्रशासनाने या घटनेला गंभीरतेने घेऊन तात्काळ 5 सदस्य चौकशी समिती स्थापन केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील 54 वर्षीय महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 4 ऑक्टोबर रोजी त्यांना बुलडाणा येथील महिला रुग्णालयच्या इमारतीत सुरु डेडिकेट कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता कक्षात ऍडमिट करून त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले.अशात 5 ऑक्टोबरला अतिदक्षता कक्षात कंत्राटी तत्वावर कार्यरत कक्षसेवक सागर जाधव रा.हतेडी ता. बुलडाणा याने या महिला रुग्णाच्या नातेवाईकाला म्हणाला की तुमच्या पेशंटला रेमेडीसिवीर इंजेक्शन लावणे गरजेचे आहे व हे इंजेक्शन लावल्याने रुग्ण बरे होतात असे सांगून विश्वासात घेऊन त्यांच्याकडून 5 हजार रुपये घेतले तर 6 ऑक्टोबरला सुद्धा पुन्हा इंजेक्शन लावायचे आहे असे म्हणत पुन्हा 5 हजार अशा प्रकारे त्यांच्याकडून 10 हजार रुपये घेतले परंतु 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास या महिला रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी नातेवाईक रूग्णालयात आले व त्यांनी या घटनेची तोंडी माहिती कोविड रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांना दिली असता डॉ. वासेकर यांनी प्रकरणाची गंभीरता समजून तात्काळ दखल घेत ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश घोलप यांना सांगितली असता डॉ. घोलप स्व:ता सकाळी कोविड रुग्णालयात पोहोचले व या बाबतची विचारपुस आरोग्य सेवक सागर जाधवला केली मात्र योग्य उत्तर मिळत नसल्याने त्यांनी या गंभीर आरोपाची दखल घेत 5 सदस्य चौकशी समिति गठित केली आहे.
दोषीवर कारवाई करणार- डॉ. घोलप
डेडिकेट कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता कक्षात भरती एका रुग्णाच्या नातेवाइकाकडून कंत्राटी कक्ष सेवक सागर जाधव याने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावावर 10 हजार रुपये घेतले, अशी माहिती कोविड रुग्णालयचे अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांच्याकडून भेटल्यानंतर आम्ही तात्काळ तिथे पोहोचलो व प्राथमिक माहिती घेतली आहे. याबाबत 5 सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली असून या कंत्राटी आरोग्य सेवकावर कारवाई केली जाणार,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश घोलप यांनी दिली आहे.
चौकशी समितीत यांचा आहे समावेश
शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णाला रेमडीसिवीर इंजेक्शन लावण्यासाठी 10 हजर रुपये एका कक्षसेवकाने घेतले,असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशी साठी एक समिति गठित करण्यात आली असून त्या मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश घोलप,आरएमओ डॉ.सचिन कदम,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर,फिजिशियन डॉ. असलम खान व अधिसेवक संदीप आढाव यांचा समावेश आहे.
*अद्याप स्वेब रिपोर्ट अप्राप्त*
4 ऑक्टोबरला या महिला रुग्णाला बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात भरती करण्यात आले होते व 5 ऑक्टोबरला कोरोना तपासणीसाठी स्वॅब नमुने घेण्यात आल्याचे समजते मात्र 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री या रुग्णाचा मृत्यू झाला.या बाबत माहिती घेतली असता असे समजले की अद्याप रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आला नाही. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की कोरोना तपासणी रिपोर्ट येण्या अगोदरच कक्ष सेवकाने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली 10 हजार रुपये का घेतले? तर या कक्ष सेवकाने अजून किती रुग्णाकडून अशाप्रकारे लूट केली आहे? या कक्ष सेवका सोबत अजुन कोणी आहे का? याची ही चौकशी होणे गरजेचे आहे.