मूल:- ( येसगाव ) दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आईवर मारहाण केली आणि वडिलांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी स्वसंरक्षणासाठी केलेला प्रतिहल्ला प्राणघातक ठरला आणि त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. २१) रात्री ८ वाजताच्या सुमारास येसगाव (ता. मूल) येथे घडली.
चंद्रशेखर नागेंद्र वाढई (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी वडील नागेंद्र पांडुरंग वाढई (६५) यांना पोलिसांनी अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर व्यसनाधीन होता आणि रोजच घरात भांडण करणे, आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणे, ही त्याची सवय झाली होती. सोमवारी आई आठवडी बाजारातून घरी परतल्यानंतर चंद्रशेखरने दारूच्या नशेत तिच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्याने घर पेटवून देण्याची धमकीही दिली.हे पाहून वडील नागेंद्र वाढई त्याला समजवण्यासाठी पुढे आले. मात्र चंद्रशेखरने त्यांच्या अंगावरही धावून जात मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, स्वतःचा बचाव करत नागेंद्र वाढई यांनी बैलबंडीच्या उभारीने चंद्रशेखरच्या डोक्यावर प्रहार केला. या प्रहारात चंद्रशेखरचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर स्वतः नागेंद्र वाढई यांनी गावचे पोलीस पाटील राजू कोसरे यांच्याशी संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी नागेंद्र वाढई यांना ताब्यात घेतले.काही वर्षांपूर्वी एका मुलाचा मृत्यू झाला होता, तर दुसरा मुलगा कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक आहे.
या घटनेने येसगाव गावात हळहळ व्यक्त होत आहे. सततचे घरगुती कलह आणि व्यसनाधीनतेमुळे एका वडिलांनी आपल्या मुलाचा जीव घेतला, ही शोकांतिका गावकऱ्यांना हादरवून टाकनारी आहे.