राजगडच्या सरपंचांसह अन्य सदस्यांचा भाजप प्रवेश ना. मुनगंटीवार यांच्या विकासकामावर प्रभावित होऊन केला प्रवेश

0
83

मुल – बल्लारपूर तालुक्यात काँग्रेसमध्ये खिंडार पडल्यानंतर आता त्याची धग मुल तालुक्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. मुल येथील राजगडच्या सरपंचांसह इतर सदस्य व विविध समाज बांधवांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासकामावर होऊन आपण भाजपमध्ये आल्याची भावना संबंधितांनी व्यक्त केली आहे. या सर्वांनी आज (शनिवार) ना. श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.*

 

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबत नाहीये. गेल्या आठवड्यात बल्लारपूर येथील शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षाने काँग्रेसच्या जाचाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर येथील काटोली गावातील सरपंचांसह अख्ख्या ग्रामपंचायतने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेला चार दिवसही व्हायचे आहेत तोच आता मुल तालुक्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

 

मुल तालुक्यातील राजगड गावाचे सरपंच काँग्रेसचे नेते रविंद्र मनोहर चौधरी यांनी अन्य सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भोई समाजाचे ऋषी पेठकर, अमोल ठाकूर, माळी समाजाचे संकेत गायधने, माना समाजाचे प्रभाकर चौधरी यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ‘सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकसात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधून भाजप मध्ये दाखल झालेले सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

 

*बल्लारपूरमधील धक्क्यातून सावरण्यापूर्वीच*

गेल्या आठवड्यात बल्लारपूर येथे मागासवर्गीयांचे नेतृत्व करणारे बल्लारपूर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद वर्मा काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला व जाचाला कंटाळून भाजपमध्ये आले. त्यांच्यासह प्रकाश वर्मा, मनोज निषाद, संदिप झिमान अशा १०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी काटोली ग्रामपंचायतचे सरपंच राजेश ढुमणे, उपसरपंच कवडू वागाडे, सदस्य अरुण गडकर, रसिका तोडासे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. ग्रामपंचायतमधील जवळपास अख्खेच्या अख्खे पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच काँग्रेसला मुलमध्ये खिंडार पडले आहे.

Previous articleअंत्ययात्रेला गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला 10 जखमी
Next articleना. सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्या मतदाराचा घेतला आशिर्वाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here