जाणून घ्या , काय चाललंय अकोल्यात..
पत्रकार सचिन देशपांडे यांच्या शब्दांत…
अकोल्यात शिवसेनेने हाथरस प्रकरणात उत्तरप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला ते योग्यच केले. पण, आपल्या गावातील, शहरातील आणि राज्यातील मुलींचे, महिलांचे जीव वाचविण्यासाठी पण, लोकप्रतिनिधींनी समोर येण्याची गरज आहे. तशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
समाजातील कन्याभ्रुण हत्या थांबविण्यासाठी समोर येण्याची गरज आहे. गर्भात कन्येचा अंश शोधणार्या डॉक्टरांना पण शिवसेना स्टाईल धडा शिकवाच. शेगाव येथील वकीलाचे प्रकरण ताजे असताना त्यात जिल्ह्यातील कुणी कुणी हात ओले करुन घेतले याचा पण शोध घ्या. त्यांना पण, शिवसेनास्टाईल धडा शिकवा.
पण, त्याकडे सोईस्कर दूर्लक्ष करणे आणि दूसर्याकडे बोट दाखविताना स्वतःच्या शंभर चुकांवर पांघरुण घालणे योग्य नाही. रस्त्यावर अतिक्रमण करत आपण राहतो, रस्ता मोकळा करा हा पोलिसांनी नागरी व्यवस्थेसाठी घेतलेला पुढाकार, आदेश चुक नव्हताच. पण, सत्ते पुढे शहाणपण चालत नाही अशीच काय ती अकोल्यात परिस्थिती निर्माण झाली. जुने शहरचे ठाणेदार प्रकाश पवार यांची बदलीचा चुकीचा संदेश पोलिसांमध्ये गेला. कायदा आणि सुव्यवस्था राबविणार्या यंत्रणेला दबावात ठेवणे हे चुक आहे आणि लोकशाहीत यंत्रणेने दबावात राहणे ही तर सर्वात मोठी चुक आहे. पोलिसांनी कर्तव्य केली नाही तर आम्ही ओरडणार आणि कर्तव्य केले तर बदली करणार हे कितपत न्याय आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार मध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आहे. गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाचे संकट घोघावत आहे. अनेकांचे जीव गेले. खाजगी रुग्णालयांनी अनेकांना लाखो रुपयांनी लुटले. त्यांची ही लुटमार रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आयुष्यभर लक्षात ठेवतील. पैसे लागले तर हरकत नाही जीव वाचला पाहिजे. केंद्र व राज्य सरकारने 150 कोटींचे अकोल्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल तयार केले. पण, त्यात राज्य शासनाने आवश्यक नोकरभरती केली नाही त्यामुळे ते थांबले. एक हजार लोकांना रोजगार देऊ शकेल इतके हे मोठे हॉस्पीटल आहे. तुर्तास 475 कर्मचार्यांची पदमान्यता देण्यात आली. राज्याच्या अर्थ खात्याकडे हा विषय व फाईल प्रलंबित आहे. हा प्रश्न गेल्या सहा महिन्यापासून सुटला नाही. त्यासाठी शिवसेनेने प्रतिष्ठापणाला लावली असती तर शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील नागरीकांनी डोक्यावर घेतले असते. शिवसेना सांगते ना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण मग सुपर स्पेशालिटी सुरु झाले पाहिजे हे समाजकारण शिवसेना विसरली का ? ….