नागभीड: नागभीड येथील माजी भाजपा जिल्हा महामंत्री व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या आईचे ९ जुन रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या 90 वर्षाच्या होत्या. त्यांना सहा मुले व एक मुलगी व नातवंड असा बराच मोठा परिवार आहे. या परिवारातील सर्वच सदस्य आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. गजपुरे कुटुंबियांनी समाजासमोर एकत्रित कुटुंब पद्धतीचे सुंदर उदाहरण आजतागायत जोपासले आहे .
आईने केलेले संस्कार व सांभाळ यातून हे सर्व घडून आले असून आईच्या या आठवणींचा ठेवा , संस्काराची ओल , मायेची सावली सदैव आपल्या कुटूंबासोबत राहावी व तसेच समाजात सुद्धा अविरत जिवंत राहावी यासाठी गजपुरे कुटुंबा च्या वतीने आईच्या चौदावीचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने पर्यावरण पूरक रित्या साजरा करायचे ठरवले. आजपर्यंत गजपुरे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत सातत्याने हिरिरीने भाग घेतला असुन आलेले दु:ख विसरुन आतापर्यंत जोपासत आलेले सामाजिक दायित्वाची जाण यापुढेही विविध उपक्रमांतुन सुरु ठेवण्याचा संकल्प या कुटुंबाने केला आहे.
यासाठी त्यांनी नागभीडच्या झेप निसर्ग मित्र संस्थेचे सहकार्य घेत आईच्या चौदावीच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व आप्त स्वकीय व मित्र परिवाराला त्यांनी ३०० वृक्ष भेट स्वरूपात दिले. त्यात बेल, कवठ, गुलमोहर, शिवन यासारख्या वृक्षांचा समावेश होता. सोबतच येत्या काळात स्मशानभुमी व सरस्वती ज्ञान मंदिरच्या प्रांगणात कठड्यांसहीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजी आमदार प्रा . अतुलभाऊ देवकर , आधारविश्व फाउंडेशन गडचिरोलीच्या अध्यक्षा सौ. गीताताई हिंगे , गडचिरोली जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रशांत वाघरे , भाजपा चंद्रपुर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ. वंदनाताई अरुण शेंडे , जि. प. चंद्रपुरचे माजी समाजकल्याण सभापती नागराज गेडाम , झेप चे अध्यक्ष जमा. पवन नागरे , व्यापारी संघाचे सचिव विजय बंडावार , गोंदियाचे डॅा. बजाज , अविनाश पाल , अजय काबरा ईत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती . गजपुरे कुटूंबाने साजरा केलेल्या “ वृक्षभेट “ या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.