नागभीड:- ( यश कायरकर )
काल दिनांक २०/६/२४ ला नागभीड तालुक्यातील मौशी गावात आसाराम दोनाडकर नावाच्या ६७ वर्षे व्यक्तीची गावातीलच संतोष मैंद (२६), श्रीकांत मैंद (२४) आणि रुपेश देशमुख (३२) यांनी मृतकाच्या घरी जाऊन हत्या केली. आसाराम दोनाडकर यांनी जादूटोणा केल्यामुळे मुलं होत नाही.घरचे वारंवार आजारी पडतात.असा आरोप मैंद कुटुंबातील व्यक्तींनी केला होता.या कारणामुळे आरोपी आणि मृतक यांच्यात वाद झाला.झटापटीत आसाराम दोनाडकर यांना आपटून मारलं त्यातच त्याचा मृत्यू झाला.
अशाप्रकारे दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात जादुटोण्याचे संशयावरून मारहाण, खून होत आहेत.या घटनांना आळा घालण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये कृती आराखडा तत्कालीन चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना जादुटोणा विरोधी कृती आराखडा सादर केला होता. कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी पालक मंत्र्याच्या उपस्थितीत आमदार अभिजित वंजारी,जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त, अभाअंनिस राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांची बैठक झाली . बैठकीत आराखड्याला मंजुरी देण्यात आली.जिल्हा निधीतून खर्चाची तरतूद करण्यात आली.परंतू त्यानंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.या आराखड्यानूसार गावागावांत जादुटोणा विरोधी कृती दल तयार करणे, त्यांना जादुटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण देणे.जादुटोण्यामुळे गावातील तंटे सामोपचाराने सोडविणे अपेक्षित होते.परंतू शासन आणि जिल्हा प्रशासन उदासीन असल्याने जादुटोण्याचे संशयावरून होणा-या हत्यांना प्रतिबंध होत नाही.जिल्हा प्रशासनाने जादुटोणा विरोधी कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी.गावागावांत जादुटोणा विरोधी कृती दल स्थापन करणे गरजेचे आहे.अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केली आहे.