उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

0
90

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोलाः
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दि.३१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकास दोन लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास एक लाख रुपये इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२२ असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सहभागासाठी अट
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
विहित नमुन्यातील अर्ज इथे उपलब्ध
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२२ पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.
असे आहेत निकष
मूर्ती पर्यावरणपुरक असावी. सजावट पर्यावरणपुरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लॅस्टीक आदी साहित्य असता कामा नयेत. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनीप्रदुषण रहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट असावी. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट याला अधिक गुण दिले आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबीर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इ.बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपारीक सांस्कृतिक कार्यक्रम/स्पर्धा, पारंपारिक/देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेशभक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यात पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त याबाबी प्राधान्याने गुण देताना विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्ज करताना कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही.
अशी आहे जिल्हास्तरीय समिती
नमूद केलेल्या बाबींची जे गणेशमंडळ पूर्तता करतील, त्यांना गुणांकन देऊन विजेत्यांची निवड करण्याकरीता जिल्हास्तरीय समितीची रचना पुढील प्रमाणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. शासकीय / शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, संबंधीत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी या समितीचे सदस्य राहतील. सदर समिती गणेश मंडळ स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक ती माहिती, व्हिडिओ, कागदपत्र मंडळाकडून प्राप्त करून घेतील व दि.१३ सप्टेंबर पर्यंत मंडळांना दिलेले गुणांकन राज्य समितीला सादर करतील.
राज्यस्तर समितीची रचना
यामध्ये सर जे.जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता / वरिष्ठ प्राध्यापक, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील वरिष्ठ गट अ मधील अधिकारी यांचा समावेश आहे. राज्यस्तर समिती ही जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येकी एक याप्रमाणे ३६ शिफारस प्राप्त गणेशोत्सव मंडळामधून गुणांकनाच्या आधारे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करतील,असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

Previous articleमंदिरातून घरी परतणा-या महिलेचे 69 हजाराचे मंगळसुत्र लुटले
Next articleस्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये अटळ लॅब व्ह्यू वर्कशॉप बुट कॅम्पचा समारोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here