बुलडाणा: जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शहापूर, खेटरी, शिरपूर, पिंपळखुटा, चांगेफळ, चतारी, चांदणी या 7 गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना तोरणा नदीपात्रातूनच जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते. याच नदीवर कोल्हापुरी बंधारा असल्याने नदीला नेहमी पाणी राहते. पावसाळ्यात तर सोडाच पण उन्हाळ्यातही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
रस्त्याअभावी शेतकऱ्यांना मालाची ने आण करताना अडचण जाते. तर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होते. या नदीवर शहापूर येथे पूल बांधण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात तोरणा नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. पूल व पक्क्या रस्त्यासाठी 2006 पासून गावकर्यांचा लढा सुरू आहे. ग्रामपंचायतने अनेकदा ठराव घेऊन शासनाकडे पाठवला मात्र ठरावाकडेही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.