बुलडाणा : सध्या सोशल मीडियावर “कपल चॅलेंज”चा ट्रेंड सुरु झाला असून नवरा- बायकोचे फोटो शेअर करण्याची स्पर्धा रंगली आहे. कोरोनाकाळात काहींना हा ट्रेंड नवरा-बायकोच्या नात्यात गोडवा निर्माण करणारा, दोघांमधील प्रेम द्विगुणित करणारा वाटतो तर काहींना हा ट्रेंड स्त्रीच्या फोटो प्रदर्शनामूळे घातक वाटत आहे.
सोशल मीडियावर यापूर्वी एकमेकांना अनेक चॅलेंज देण्याचे ट्रेंड आले व येत असतात मात्र सध्या कोरोनाच्या लॉकडाऊननंतर नेटिझन्सने ‘कपल चॅलेंज’ ही अनोखी स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेत सोशल मीडियावरील मित्र आपल्या प्रिय व्यक्तीचा किंवा पत्नीसोबत काढलेला फोटो फेसबुकवर शेअर करून आपल्या जवळच्या दहा ते पंधरा मित्रांना चॅलेंज करतात त्यानुसार त्या नेटिझन्सचे मित्र ते चॅलेंज स्वीकारून स्वत:च्या पत्नीसोबत काढलेला सुंदर फोटो शेअर करून पुन्हा चॅलेंज करतात़ अशाप्रकारे एकमेकांना चॅलेंज करून आपल्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करण्याची सोशल मीडियावर स्पर्धा लागली आहे. अल्पावधीतच हा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. फेसबुकवर स्क्रोल केले तर सगळीकडे ‘चॅलेंज कपल’ हेच दिसून येत आहे. या स्पर्धेत नवविवाहित युवक, युवतींसह ज्येष्ठांचाही समावेश आहे. काहींनी आपल्या परिवारासोबतचा फोटो शेअर करून चॅलेंज केले आहे़ हा ट्रेंड कसा सुरू झाला, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.
एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर दुसऱ्यांना चॅलेंज दिले तर ते व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. कपल चॅलेंजबाबतही तसेच झाले आहे. कोणताही विचार न करता अनेक जण हे चॅलेंज स्वीकारत आहेत. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्वीकारणारे मित्र आपल्या प्रिय व्यक्ती किंवा पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर करून एकमेकांना चॅलेंज करीत आहेत़ या चॅलेंजच्या माध्यमातून मात्र मुलींचे किंवा स्त्रियांचे फोटो टाकणे घातक असल्याच्या सतंप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत.
हे चॅलेंज स्विकारतांना..
चॅलेंज स्विकारायचे झाल्यास कोरोना विरुद्ध लढण्याचे, संकटकाळात अन्न- वस्त्र वाटपाचे, शिक्षणासाठी वही पुस्तक वितरणाचे, स्वच्छतेचे, किंवा निसर्ग हिरवा करण्यासाठी झाडे लावण्याचे चॅलेंज स्विकारावे, असे जाहीर आवाहन सोशल मिडीयाव नेटकऱ्यांनी केले आहे.