पत्रकार परिषदेत दिली माहिती
अकोला: पारस औष्णिक विद्युत केंद्रातील स्थानिक कंत्राटी कामगारांना डावलले जात आहे. त्यांना पूर्णवेळ कामगार म्हणून नियुक्ती दिली जात नाही. अनेक वर्षे काम करूनही त्यांच्यावर अन्याय होत असल्याने त्याला वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येत असल्याचा इशारा शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आला.
अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करूनही त्यांच्या भवितव्याचा विचार होत नाही. त्यांच्या हक्काबाबत शासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. कामगारांना नियमित पूर्णवेळ काम मिळावे, कामगारांच्या कामाचा दुरुपयोग होऊ नये, स्थानिक कामगारांना पूर्णवेळ कामगार म्हणून नियुक्ती द्यावी, कामगारांना कंत्राटदाराकडून मिळणा-या धमकीची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागण्या लावून धरल्या. प्रहार जनशक्ती पक्ष पारसच्या वतीने बेमुदत छेडण्यात येईल. पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख डॉ. रोशन खंडारे,तालुका अध्यक्ष राजू उबाळे, सल्लागार आशीष वानखडे, गोपाल जळमकर,असंघटित विंगचे अध्यक्ष प्रवीण चिकटे यांच्यासह कामगार उपस्थित होते.
पारस औष्णिक विद्युत केंद्रातील कामगारांचे हक्क डावलले जात आहेत. त्यांच्या मागण्यांचा अधिकारी विचारही करीत नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाला आवाज उठवावा लागला. विविध टप्प्यावर आंदोलन होणार असून कामगारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.