अकोल्याच्या मातीत रुजले ‘सफरचंद’

0
270
देऊळगावच्या जिगरबाज शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग;जैविक पद्धतीने संगोपन
संकलन: 
डॉ. मिलिंद दुसाने
जिल्हा माहिती अधिकारी, अकोला
मो.क्र. 9422789734

अकोला: हिमाचल प्रदेश किंवा जम्मू काश्मिर सारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशातील फळ म्हणून सफरचंद (Apple) ओळखले जाते. मात्र या धारणांना फाटा देत देऊळगाव ता. पातूर येथील जिगरबाज शेतकरी संतोष नारायण वानखडे यांनी धाडसी प्रयोग करीत आपल्या शेतात चक्क सफरचंद या फळपिकाची लागवड केली आहे. आता ही रोपे एक वर्षाची झाली असून त्यांची वाढ चांगलीच जोमदार झाली आहे. विशेष म्हणजे वानखडे सफरचंदासहीत आपली उर्वरित शेती ही संपूर्ण जैविक पद्धतीने करत आहेत. देऊळगाव येथील शेतकरी संतोष वानखडे यांनी आपल्या शेतातील २० गुंठे क्षेत्रात सफरचंदाची ५५० रोपे लावली आहेत. अकोला जिल्ह्यासारख्या  उष्ण हवामान असलेल्या भागात हा तसा धाडसी प्रयोग म्हणावा लागेल.

हिमाचल प्रदेशातून मागविली रोपे
सद्यस्थितीत महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, अहमदनगर येथे काही शेतकऱ्यांनी सफरचंद लागवड केली आहे. त्यांच्या संपर्कात संतोष वानखडे आहेत. त्यातूनच त्यांचा संपर्क हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादक शेतकरी  पुरणसिंग बुनकर रा. दुर्गाला ता. शहापूर जि. कांगाडा यांच्याशी झाला. मोबाईल वरुन व यु ट्युबच्या माध्यमातून या शेतकऱ्याने विविध प्रयोगांची माहिती घेऊन मग आपल्या शेतात सफरचंद लावण्याचा निर्णय घेतला.
जैविक पद्धतीने संगोपन
त्याआधी गेल्या चार वर्षांपासून वानखडे यांनी शेती करतांना संपूर्ण जैविक पद्धतीने शेती करण्याचा अंगिकार केला होता. त्यामुळे सफरचंदही त्याच पद्धतीने लागवड करुन संगोपन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे सद्यस्थितीत १२ हजार रुपये शेकडा या दराने आणलेले सफरचंदाची रोपे व केलेली मेहनत वगळता त्यांना कोणताही भांडवली खर्च  करावा लागलेला नाही. या पिकांसाठी लागणारे जीवामृत, घन जीवामृत, मिनरल तत्त्व, सुक्ष्म अन्नद्रव्य, शेण स्लरी इ. सगळे जिन्नस ते स्वतःच शेतात बनवतात आणि वापरतात.
एक वर्षात रोपांची वाढ जोमदार
दि.२२ जानेवारी २०२१ ला त्यांनी आपल्या शेतात ही रोपे आणून लावली. आज त्या रोपांची अवस्था अत्यंत चांगली आहे. त्यांच्या शेतात त्यांनी एचआरएम ९९, अन्ना, डोअरशेड गोल्डन या तिन जातीची रोपे लावली आहेत. ही रोपे ४८ ते ५० अंश सेल्सिअस तापमानातही जगू शकतात. त्यासाठी या जातींची निवड त्यांनी केली. त्याचा परिणाम म्हणजे गेल्या वर्षाच्या उन्हाळ्यात ही रोपे टिकली. आता सध्या ही रोपे चांगली जोमदार वाढलेली असून ६ ते ८ फुट उंच वाढलेली आहेत. काही रोपांना फुलेही आली आहेत. तथापि, त्यांना सफरचंदाचा पहिला हंगाम हा रोपे पूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजेच तीन वर्षांनी घ्यावयाचा आहे. म्हणून त्यांनी आता रोपांची छाटणी सुरु केली आहे.
सफरचंदाची रोपे लावतांना दोन फुट खोल व एक फुट रुंद एक फुट लांब असे खड्डे केले. त्यात   एक किलो शेणखत टाकले. त्यानंतर ही रोपे लावण्यात आली. या रोपांना आठवड्यात एकदा एकतास ठिबक संचाने पाणी दिले जाते. या जातींना जादा पाण्याची गरज नसते,असेही शेतकरी वानखडे सांगतात. याशिवाय  हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना सफरचंद लागवडी संदर्भात जे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होत असते त्या बैठकांना ऑनलाईन पद्धतीने संतोष वानखडे सहभागी होऊन वेळोवेळी मार्गदर्शन मिळवत असतात.
कांदा व हरभऱ्याचे आंतरपिक
सद्यस्थितीत सफरचंदाच्या रोपांच्या दोन ओळीत ते आंतरपिक घेत आहेत. त्यात त्यांनी खरीप हंगामात कांदा तर रब्बी हंगामात हरभरा लागवड केली आहे.ही पिकेही ते जैविक पद्धतीनेच घेतात.
एका झाडापासून २० किलो उत्पन्न अपेक्षित
सफरचंदाचे रोप परिपक्व झाल्यावर (तीन वर्षानंतर)  जानेवारी ते फेब्रुवारी या काळात त्याला फुलधारणा होते. त्यानंतर फलधारणा होऊन मे पर्यंत फळे पक्व होऊ लागतात. प्रत्यक्ष मे मध्ये  फळे काढणीला सुरुवात होते. एका झाडापासून २० किलो फळांचे उत्पादन मिळू शकते,असेही वानखडे यांनी सांगितले.
वानखडे यांच्या या प्रयोगाबद्दल कृषी विभागाला माहिती मिळाल्यावर  मंडल कृषी अधिकारी इंगळे, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या जैविक शेतीच्या प्रयत्नांनाही कृषी विभागामार्फत मार्गदर्शन होत असते. सद्यस्थितीत ‘आत्मा’च्या शेतकरी मार्गदर्शक गटात वानखडे यांचा समावेश करण्यात आला आहे. सफरचंदाची लागवड तर यशस्वी ठरली आहे; आता प्रतीक्षा प्रत्यक्ष उत्पादनाची आहे. आपल्या शेतातून विषमुक्त पिक निर्माण व्हावे,असेच संतोष वानखडे यांचे प्रयत्न आहेत.
Previous articleगॅस दरवाढीविरोधात अकोला जिल्हा महिला काँग्रेसचा एल्गार
Next article​अकोला पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचा-याकडून महिलेवर अनैसर्गिक अत्याचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here