३१ च्या पेपरची प्रश्नपत्रिका २४ लाच वितरीत
आरोग्य विभागाच्या परिक्षेत पेपर फुटल्याचा परिक्षार्थ्यांचा आरोप, चौकशीची मागणी
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: आरोग्य विभागाच्या विविध पदासाठी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप परिक्षार्थ्यांनी केला आहे. अमरावती येथील तक्षशिला महाविद्यालयातील परिक्षार्थ्यांना २४ ऑक्टोबरला क वर्गाच्या पदासाठीचा पेपर पुन्हा आज झालेल्या ड वर्गाच्या परिक्षार्थ्यांना देण्यात आल्याने न्यासा कंपनीचा आणखी एक घोळ समोर आला आहे. तर या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी परिक्षार्थ्यांनी केली आहे.
त्याचे झाले असे की, अकोला जिल्ह्यातील काही परिक्षार्थ्यांनी २४ ऑक्टोबरला पोस्ट क्रमांक २३ ज्युनिअर क्लार्क म्हणजेच कनिष्ठ लिपिक पदासाठी परिक्षा दिली. या परिक्षेत त्यांना मिळालेली प्रश्नपत्रिका पोस्ट क्रमांक २३ ऐवजी पोस्ट क्रमांक ४३ ची देण्यात आली. आणि हीच प्रश्नपत्रिका पुन्हा आज ड वर्गासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेसाठी वितरीत करण्यात आली. हा सर्व प्रकार आज (३१ ऑक्टोबररोजी) झालेल्या परिक्षेनंतर उघड झाला. काही विद्यार्थ्यांनी यासंदर्भात सोशल मिडियावर वाच्यता केली. आता नेमकी ही चूक न्यासा कंपनीकडून झाली की तक्षशिला परिक्षा केंद्र संचालकाकडून याची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.