2 शेतकरी ठरले गुलाबी चक्रीवादळाचे बळी
प्रशांत खंडारे/कासिम शेख @व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गुलाबी चक्रीवादळाने हिरव्या स्वप्नांचा कोळसा केला. शेतकरी धास्तावले. यातूनच शेतीसाठी काढलेल्या कर्जाच्या विवंचनेत बुलडाणा तालुक्यातील खुपगांव येथे एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येने गांव हादरून गेले आहे. सिद्धेश्वर दिनकर जाधव यांनी विष प्राशन केले तर संदीप लक्ष्मण नावकर याने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. जिल्ह्यात गेल्या 8 महिन्यात 180 व विदर्भातील 6 जिल्ह्यात 21 वर्षांमध्ये जवळपास 19 हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
बुलडाणा तालुक्यातील खुपगाव येथील 45 वर्षीय शेतकरी सिद्धेश्वर दिनकर जाधव यांनी बँकेचे कर्ज काढून 4 एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र हातातोंडाशी आलेला घास गुलाबी चक्रीवादळाने हिरावला. चार एकर शेती पाण्याखाली गेल्याने कर्जाच्या विवंचनेत त्यांनी 29 सप्टेंबर रोजी विषप्राशन केले. येथील जिल्हा रुग्णालयात त्यांचा 1 ऑक्टोबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. जाधव यांच्या मृत्यूची वार्ता पसरत नाही तोच, अपंग भाऊ आणि अपंग वडिलांना सांभाळणाऱ्या संदीप लक्ष्मण नावकार या 36 वर्षीय युवकाने सकाळी 11 वाजता राहत्या घरात गळफास लावून मृत्यूला कवटाळले.वडिलांची अडीच एकर शेती असून ती संदीपच्या डोळ्यादेखत पावसाने उद्ध्वस्त केल्याने संदीप चिंताक्रांत झाला. वडिलांनी शेतीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 1 लाख 55 हजार रुपयांचे कर्ज काढले आहे. आता कर्ज कसे फेडायचे?उदरनिर्वाह कसा करायचा? या नैराश्यातून अखेर संदीपने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. एकाच दिवशी 2 आत्महत्येच्या घटनेमुळे अख्खे गाव हादरले असून गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
बुलडाणा जिल्ह्यात 180 पैकी 24 प्रकरणे पात्र, 93 प्रलंबित
गेल्या 8 महिन्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबाची 180 प्रकरणे दाखल झाली. 24 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत. 93 प्रकरणे प्रलंबित तर 63 प्रकरणे अपात्र आहे. शवविच्छेदन अहवाल सोबत जोडलेला नसणे किंवा इतर त्रुटींमुळे ही प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
21 वर्षांत 19 हजार बळी..
मागील 21 वर्षांत विदर्भातील सहा जिल्ह्यांत 18 हजार 711 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यात अमरावतीमध्ये जवळपास 4 हजार 200 शेतकरी आत्महत्या झाल्या. अकोला जिल्ह्यात 2 हजार 661 यवतमाळ 4 हजार 920, बुलडाणा 3 हजार 388, वाशीम 1 हजार 709 तर वर्धा जिल्ह्यात 1 हजार 983 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.हे आकडे सध्यास्थितीत फुगलेले दिसून येईल. जवळपास आत्महत्यांचा हा आकडा 19 हजारांवर पोहोचेल.
लोकप्रतिनिधींनी धीर देण्याची गरज..
दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. दुष्काळ ओला असो की कोरडा शेतकऱ्यांचे सोन्यासारखे पीक मातीमोल झाले तरी, त्यांना अपेक्षित मोबदला मिळाला नाही. लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. मात्र त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप केला जातो. शासनाची तोकडी मदत शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढू शकत नाही. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना धीर द्यावा,नैसर्गिकआपत्ती विभाग शेतकर्यांचे समुपदेशन करीत असल्याचा दावा करते. मात्र आत्महत्या वाढत असल्याची चिंता आहे.आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे समुपदेशनही महत्त्वाचे असून त्यांना भरीव मदत अपेक्षित आहे.