बापू, तुझा देश राहिला न आता..
प्रशांत खंडारे @ व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : देशाचा अनैतिक आधार ठरलेल्या दारूने कोरोना महामारीच्या काळात सरकारला सावरले. दारू सरकारला सावरत आली असली तरी, नव्वद टक्के लोकांचा संसार उध्वस्त करत आली आहे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजेच बापूंची जयंती त्यांचा स्मृतिदिन! मात्र या स्मृतिदिनीही जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहतोय, ही शोकांतिका ठरत असली तरी, अवैध दारूच्या महापुरात काही ‘हात’ओले झाल्याने हा ‘ड्राय’डे ‘ओला’ ठरत आहे.त्यामुळे “बापू तुझा देश राहिला ना आता! नथुराम लाथा रोज झाडी!असा प्रत्यय येत आहे.
बुलडाणा जिल्हा हा मातृतिर्थ जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र जिल्ह्यातील तेराही तालुक्यात अवैद्य दारूची गंगा (गंगा म्हटले तर अपमान होईल) वाहती आहे. या वाहत्या गंगेत कोण ‘हात ओले’ करून घेतो हे समजणे इतपत दुधखुळे कोणी नाहीच! वरिष्ठांना केसेस दाखविण्यासाठी यंत्रणा कारवाई करते. नंतर मात्र त्यांना खुली सूट दिल्याचे चित्र दिसते. राज्य उत्पादन शुल्क म्हणा की,पोलीस विभाग तक्रार आली किंवा मर्जीने कारवाई करतात, असा अनुभव आहे. राज्य उत्पादन शुल्क वर्षाच्या अहवालातून फूगवलेले आकडे दाखवते. पोलीस प्रशासन मात्र तुरळक कारवाईत गुंग असते. कोरोना काळात सर्व बंद असताना दारूचे दुकान मात्र बंद ठेवण्याचे आदेश असूनही मागच्या दाराने सुरू होते. दारू विक्रेत्यांनी मद्यपींची लूट केली. लाखो रुपयांचा फायदा करून घेतला. इतर सर्व क्षेत्रात मंदी असताना दारू विक्रेते मात्र मजेत होते.आणि यंत्रणेचे हात देखील पैशात होते. त्या वेळी संचारबंदी, कोरोना नियमांचे उल्लंघन यासाठी मात्र पोलीस यंत्रणा श्रीमंतासह गोरगरिबांवर कारवाई करत होती. कारवाई करणे आवश्यक होते. मात्र बिनबोभाटपणे अवैध दारूविक्री होत असल्यावर, यंत्रणेला सर्व ठिकाण माहित असल्यावर, कारवाई होत नाहीत अशा, तक्रारी पुढे येत आहेत. आज 2 ऑक्टोंबर रोजी बापूजींची जयंती आहे. परंतु जिल्ह्यातच नव्हे तर बुलढाणा शहरातील अनेक भागात अवैध दारू विक्री होत आहे. त्यामुळे ‘बापू तुझा देश राहिला ना आता’ असे शब्द सुजाण नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.