▪️ शिक्षेचे प्रमाण 58.73 टक्क्यांवर..
प्रशांत खंडारे @
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कायद्याची बुज सर्वांनी राखावी एवढी पोलिसांची माफक अपेक्षा असते.शांतपणे, दृढतेने कार्यरत पोलिस अधिकारी, कर्मचारी स्थिर व स्थायी पोलीस व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ असतात. ते तात्काळ उपाय शोधण्याच्या नावाने नियमांचा भंग करीत नाहीत. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हे देखील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांमधून मार्ग काढत जिल्ह्याचे चक्र फिरते ठेवण्यात असामान्य योगदान देत आहेत. ते अपुरे मनुष्यबळ असताना गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरले असून या कर्तव्यनिष्ठेच्या वर्षपूर्तीत गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण हे 58.73 टक्क्यावर पोहोचले आहे.
20 सप्टेंबर 2020 पासून जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्हा पोलिस दलाची सूत्रे स्वीकारली. तेव्हापासून त्यांनी आपल्या कर्तव्यकाळाचा कधीही बागुलबुवा केला नाही. कठीण परिस्थितीतही अचूक निर्णय घेऊन चांगले नेतृत्वगुण दाखवून दिले. क्लिष्ट गुन्ह्यांचा चिवटपणे शोध घेणे, सफेदपोष उच्चभ्रू गुन्हेगारांच्या क्लुप्त्या समजून घेणे, धार्मिक दृष्ट्या संवेदनशील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून सर्वसामान्य माणसांच्या अंतर्मनातील भावनिक बारकाव्यांचा अचूक वेध घेणे हे चावरिया यांना सहज जमते.”ताठ मानेने काम करा”, असा संदेश सहकाऱ्यांना देत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाण करून देत आहे.सोबतच प्रत्येकांना त्यांचा हक्क ही मिळवून देत आहे.
त्यांनी जानेवारी महिन्यात 1424 पोलिसांच्या खांद्यावर पदोन्नतीची फित लावली. पोलिसांचे जोखीम भत्ते दीडपट केले. प्रतीक्षेतील प्रकल्पग्रस्तांच्या जागा भरल्या. पोलिसांच्या नव्या घरांचा प्रश्न जवळपास पूर्णत्वास येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पसंतीनुसार बदली दिली. त्यांच्या संकल्पनेतून दामिनी,पोस्को, पोलीस पाटील मार्गदर्शिका, सायबर गुन्हे मार्गदर्शिका पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. शासनाच्या डायल 112 उपक्रम राबविण्यासाठी 490 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. डी पी डी सी अंतर्गत 1 कोटी 25 लाख रूपये मंजूर करून पोलीस दलासाठी 16 बोलेरो, 19 पॅशन प्रो वाहनांची खरेदी करून कामाला गती दिली. एकूणच
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे त्यांच्या नेतृत्वगुणामुळे शक्य झाले आहे. 2732 पोलिसांची जिल्ह्यात आवश्यकता असताना जवळपास 2600 पोलीस कार्यरत आहेत. तरीही
गुन्हेगारांना शिक्षा करण्याचे प्रमाण 58.73 टक्क्यावर पोहोचले आहे. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांचा दबदबा कायम आहे. भविष्यात बरीच आव्हाने पेलायची असली तरी, त्यांची निस्सीम कर्तव्यनिष्ठा सॅल्यूट ठोकण्यासारखी आहे.
वर्षभरातील कामगिरीवर दृष्टिक्षेप..
जिल्ह्यात कोविड नियम तूडविणाऱ्या विरुद्ध एकूण 3738 गुन्हे दाखल केले. दरोड्याचे 21 गुन्हे घडले ते 100 टक्के उघडकीस आणले. खुनाचे 49 गुन्ह्यांपैकी 46 उघडकीस आणून 96 टक्के डिटेक्शन केले तर खुनाचा प्रयत्न करण्याचे शंभर टक्के डिटेक्शन आहे. घरफोडीचे 71 गुन्हे उघडकीस आणले. चोरीचे 324 गुन्हे दाखल करून आरोपी गजाआड केले आहे. जुगार कायद्यांतर्गत 2160 गुन्हे दाखल करून गतवर्षीपेक्षा 334 गुन्हे अधिक दाखल केले. अग्निअस्त्र व धारदार शस्त्र संबंधीचे 34 गुन्हे दाखल करून गतवर्षीच्या तुलनेत 26 गुन्हे जास्त दाखल करून शस्त्र संबंधीची जप्तीची कारवाई करण्यात आली. दारूबंदी कायद्यांतर्गत 4370 गुन्हे दाखल केले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 52 गुन्हे अधिक आहेत. 14 सराईत आरोपी तडीपार केले. चिखलीतील एका आरोपीला प्रथमच 8 वर्षात एमपीडीए कायद्यांतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध केले. मोटर वाहन कायद्यांतर्गत 499298 केसेस करून 34200738 रुपयांची दंड वसुली केली. मुस्कान मोहिमेअंतर्गत 558 मुला-मुलींचा शोध लावून त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर मुस्कान आणली. महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक कक्ष येथे कौटुंबिक वादाचे 446 प्रकरणे दाखल झाली. या प्रकरणात समुपदेशन करून 134 प्रकरणात आपसी समेट घडवून आणला व 116 प्रकरणे दप्तरी फाईल केले.