कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेत आरोग्य विभाग नापास

0
340

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केवळ 6 टक्के!
– कुटुंब नियोजनाच्या साधनांचे वाटप मात्र समाधानकारक

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: गेल्या सुमारे अठरा महिन्यांपासून देशभरात थैमान घालीत असलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच आरोग्य विषयक कार्यक्रम प्रभावीत झाले असून, याहीवर्षी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमाचा बट्टयाबोळ झाला आहे. ऑगस्ट 2021 च्या अखेरीस अकोला जिल्ह्यात केवळ 6 टक्के कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांची आरोग्य विभागाच्या अहवालात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात केवळ 6 टक्के शस्त्रक्रिया पार पडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
गेल्या अठरा महिन्यांपासून देशासह जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. गेल्या वर्षीपेक्षा कोरोनाची दुसरी लाट भयानक ठरली असून, सध्या ही लाटही ओसरली असली तरी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबविले जाणारे सर्वच आरोग्य विषयक कार्यक्रम प्रभावीत झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये कुटुंब नियोजनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचाही समावेश आहे. प्रत्येक वर्षी सर्व जिल्ह्यांना शहरी आणि ग्रामीण भागातील पुरूष आणि महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे ‘टार्गेट’ अर्थात ‘लक्ष्य’ दिले जाते. अकोला जिल्ह्याला सन 2021- 2022 साठी 8 हजार 097 शस्त्रक्रियांचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यामध्ये पुरूषांच्या 674 आणि महिलांच्या 7 हजार 423 शस्त्रक्रियांचा समावेश आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सर्वच ठिकाणी शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा कार्यक्रमही प्रभावीत झाला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे कोठेही या शस्त्रक्रियांसाठीची सामूहिक शिबीरे आरोग्य विभागाला आयोजित करता आलेली नाहीत, त्यामुळे या काळात ग्रामीण भागात पुरूषांच्या 9 म्हणजे केवळ 1 टक्के शस्त्रक्रियांची नोंद झाली आहे. दुसरीकडे टप्याटप्याने महिलांच्या करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामध्ये शहरी भागात गेल्या पाच महिन्यांमध्ये केवळ 393 तर ग्रामीण भागात 122 अशा एकूण केवळ 515  महिलांच्या टाक्याच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. अर्थात संपूर्ण जिल्ह्यात महिलांच्या शस्त्रक्रियांची टक्केवारी केवळ 7 एवढी नोंदविली गेली आहे.
पुरुषांच्या केवळ ९ शस्त्रक्रिया
गेल्या अठरा महिन्यांच्या काळात पुरूषांच्या बिनटाक्याच्या केवळ 9 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत तर दोन अपत्यांवर पुरूषांच्या 5 शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे. शहरी भागात 223 महिलांनी तर ग्रामीण भागात 65 महिलांनी दोन अपत्यांवर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्याची शासन दप्तरी नोंद घेण्यात आली आहे. या शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य संस्थांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करीत पार पाडण्यात आल्या. जिल्ह्याला अशा 5 हजार 263 शस्त्रक्रियांचे टार्गेट देण्यात आले आहे परंतु ते पूर्ण होण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे.
साधने वाटपात आघाडी
कोरोनाच्या या काळात कुटुंब नियोजनाची साधने वाटप करण्याच्या कामात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याला 6 हजार 419 तांबी वाटपाचे वार्षिक टार्गेट देण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी घरोघरी भेटी देत गेल्या पाच महिन्यांच्या काळात शहरी भागात 1 हजार 561 आणि ग्रामीण भागात 887 अशा एकूण 2 हजार 448 म्हणजे 38 टक्के तांबीचे वाटप केले आहे. सोबतच गर्भनिरोधक गोळ्यांची ग्रामीण भागात 7 हजार 981 आणि शहरी भागात 2388 अशी एकूण 10 हजार 369 पाकिटे आणि 49 हजार 195 गर्भनिरोधक साधने (निरोध) वितरीत केल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे.

Previous articleलय भारी! ‘ मिनी सर्कस तुमच्या दारी..
Next articleस्वच्छतेसाठी श्रमदान मोहीमेत सहभागी व्हा; मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here