अकोल्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेवर शरसंधान
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अशा गद्दार शिवसेनेसोबत आम्ही भविष्यात कदापीही युती करणार नाही असे स्पष्ट करीत मुंबई महापालिकेत एक हाती सत्ता आणून मुंबई काबीज करणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे हे अकोला दौ-यावर होते. तेव्हा त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले.
राज्यातच नव्हेतर देशात पक्षाचा कार्यकर्ता समाजसेवेसाठी कटिबद्ध आहे. आमचे कामच आम्हाला आगामी निवडणूकांमध्ये यश मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत पुढील काळातील महापालिका, नगरापालिका, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकांमध्ये भाजपा अग्रस्थानी असेल. शिवसेना ज्या मुंबईच्या भरवशावर उड्या मारत आहे, आगामी निवडणूकीत शिवसेनेची मस्ती नक्कीच उतरेल. मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता आणणार असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी जनता जनार्दन मोठ्या संख्येने उभी राहुन महाशक्तिशाली राष्ट्र निर्माणासाठी आशीर्वाद प्रधान करणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या महाराष्ट्रात अराजकतेचे स्वरूप आले आहे. सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. प्रत्येक क्षेत्रात खंडणीखोर, भूखंड माफिया तयार झाले आहेत. स्वत: दोषी असताना मात्र केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचेच काम सध्याचे सरकार करीत आहे. पण याने काहीच फरक पडणार नाहीये. प्रत्येक बाबतीत मोफत सल्ला देण्याचा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने निवडला आहे.
शेतक-यांना वा-यावर सोडले
महाराष्ट्रातील काही जिल्हयात अतिवृष्टी झाली. 45 दिवस उलटूनही अद्याप शेतक-यांना मदत मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडल्याची टिकाही चंद्रकांत पाटील यांनी केली. बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीवर अन्याय करणारे हे सरकार असून ओबीसी व मराठ्यांमध्ये फुट पाडण्याचे काम या सरकारने केले आहे असा आरोपही त्यांनी केला. यावेळी आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.