” गाव निघालं शिकायला”! अभियानाचा प्रारंभ

0
393

घरे, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंती झाल्या बोलक्या! 
शिक्षक गजानन खेंडकर यांचा नाविण्यपूर्ण उपक्रम

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: एक ध्येयवेडा व्यक्ती आपल्या उदि्दष्टयापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करू शकतो याची प्रचिती जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षक गजानन खेंडकर यांच्यारूपाने आली आहे. खेंडकर यांनी जिल्हा प्रशासन आणि कळंबेश्वर ग्रामपंचायतच्या सहकार्याने ”गाव निघालं शिकायला” हा अभिनव शैक्षणिक उपक्रम कळंबेश्वर पासून सुरू केला आहे. या शैक्षणिक उपक्रमात परिसरातील इतरही अनेक गावे, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक सहभागी होत आहे.
”गाव निघालं शिकायला” या उपक्रमा अंतर्गत गावातील घरे, शाळा, ग्रामपंचायतीच्या भिंती स्थानिक प्रशासन व गावकरी यांच्या सहकार्याने आणि सहमतीने रंगवून शाळकरी मुलांसोबतच गावातील इच्छुक प्रोढ नागरिकांनाही साक्षर करण्याचा विडा खेंडकर यांनी उचलला आहे. शिक्षक आमदार डॉ. किरण सरनाईक यांनी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा तसेच वाचनालय डिजीटल करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. खेंडकर यांनी आपले घर वाचनालयासाठी दान केले असून, हे वाचनालय शाळकरी मुलांसोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या युवक आणि युवतींसाठीही २४ तास खुले राहणार आहे. विद्यार्थ्यांना २४ तास वाय-फाय उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय वेगवेगळ्या शैक्षणिक विषयावर आधारित स्पर्धाही या वाचनालयामार्फत घेण्यात येतील.

गावांमध्ये आरोग्य विषयावरही कार्यक्रमांचे आयोजन करून त्याअंतर्गत रक्तगट तपासणी, रक्तदान शिबीरांचे आयोजन केले जाईल. त्याआधारे गावातील रक्तदात्या व्यक्तींच्या रक्तगटांची यादी तयार करण्यात येईल व ज्यावेळी रक्ताची आवश्यकता असेल त्यावेळी ते गावकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंचक्रोशीसाठी एक रुग्णवाहिका ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून यापुढे कृषी, महसूल, न्यायालयीन कामकाज यांची माहिती देण्यासाठी दर दोन महिन्यांनी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन ग्रामोन्नतीतून राष्ट्रोन्नतीकडे हातभार लावण्यासाठी आमच्या ग्रुपतर्फे खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न राहणार आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्याशी सुद्धा यासंदर्भात बोलणे झाले आहे. त्यांना या कामाची माहिती देण्यात आली असून निधीची उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांना पत्रव्यवहार करणार आहे.
गावात शैक्षणिक वातावरण
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी कशा दूर करता येतील या विचारातून ही संकल्पना पुढे आली. सरपंच अनिल निकामे यांच्याशी संवाद साधून ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनात या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. बघता बघता गावात शैक्षणिक वातावरण तयार झाले. लोक वर्गणी देण्यास तयार झाले. पाढे, बाराखडी, इंग्रजी, मराठीचा व सामान्य ज्ञानाचा फलक बाहेर भिंतीवर टागला. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ कुतूहलाने वाचायला लागले. त्यातून सुचलेल्या उपक्रमाला ”गाव निघालं शिकायला” हे नाव दिले व उपक्रम सुरू झाला. याची कल्पना शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बीडीओ, बीईओ यांना भेटून देण्यात आली असून, त्यांचेही सहकार्य अपेक्षित आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी या उपक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोपविली असल्याचे गजानन खेंडकर यांनी सांगितले.

Previous articleदुसरबीडजवळ टिप्पर उलटले, समृद्धी च्या कामासाठी जाणारे १० मजूर ठार
Next articleआगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार –  बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here