वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ‘कौशल्यातून रोजगाराकडे- आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर शुक्रवार, ३० जुलै २०२१ रोजी दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील युवक-युवतींनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
३० जुलै रोजी होणाऱ्या मार्गदर्शन सत्रात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे कौशल्य अभियान अधिकारी नितीन जाधव, पुणे येथील ओ.पी.सी. प्रा. लि. आस्थापना ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद दिगंबर आमले, अमरावतीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, लातूर येथील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने हे मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांना https://www.facebook.com/MaharashtraSDEED या फेबुक पेजद्वारे किंवा https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A या यु-ट्यूब लिंकच्या सहाय्याने वेबीनरमध्ये सहभागी होता येणार आहे.
राज्यातील युवक-युवतींसाठी वर्षभर प्रत्येक आठवड्यामध्ये दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत एकूण ५२ मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांशी संवाद साधण्यात येणार असून त्याद्वारे उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, दहावी-बारावी नंतरच्या संधी, इतर विविध क्षेत्रांसंबंधी माहितीविषयी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता एकूण १२ व प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत उद्योजकता विषयक एकूण १२ असे वर्षभरामध्ये एकूण ७६ ऑनलाईन मोफत मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी या सत्रात सहभागी व्हावे. काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४, ९७६४७९४०३७, ९६६५५२५६५१, ८१०८८६८४०३ या क्रमांकावर संपर्क करावा अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.