शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा, अनेक पिढ्यांचा उद्धार करणा-या ठरल्या – पुरुषोत्तम आवारे पाटील

0
275

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला:
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी  त्याकाळी द्रष्टेपणाने केलेल्या सामाजिक सुधारणा ह्या समाजातील अनेकांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या ठरल्या, त्यामुळेच आजच्या लोकशाही व्यवस्थेतही शाहू महाराजांचे कार्य तितकेच मार्गदर्शक आहे. त्यासाठी शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणांचा, त्यामागील तत्वाचा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अंगिकार करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील (संपादकः दैनिक अजिंक्य भारत) यांनी आज येथे केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकशाही सभागृहात पुरुषोत्तम आवारे पाटील यांचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक सुधारणांचे धोरण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर आपल्या व्याख्यानात बोलतांना आवारे पाटील म्हणाले की, राजेशाही लोकांना नकोशी झाली होती, अनेक चळवळी राबवून लोकशाही व्यवस्था अंमलात आली, तरीही अशा काळात केवळ छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज या दोन राजांचे राज्य पुन्हा यावे अशी अपेक्षा आपण करतो. कारण या दोनही राजांनी त्यांच्या सत्तेचा उपयोग लोक कल्याणासाठी केला असल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाहीचा मुलतत्त्वांचाअंगिकार आणि प्रत्यक्ष वापर या राजांनी त्यांच्या शासन काळात केला. लोकांना खऱ्या अर्थाने हे राज्य आपले आहे असे वाटू लागले. आणि राजांनीही आपण देवाचे अवतार नसून या राज्याचे रक्षक, विश्वस्त आहोत या भावनेतून राज्य केले.
ते पुढे म्हणाले की, शाहू महाराजांनी आपल्या शासन काळात तत्कालिन सामाजिक रुढी परंपरांना न जुमानता समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी क्रांतीकारी निर्णय घेतले, त्यांची अंमलबजावणी स्वतः पासून केली. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्यांचे वर्तन होते.
त्यांनी सांगितले की, शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शैक्षणिक सुधारणांचा पाया रचला. त्यातुन प्रशासनात सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेतले. सरकारी नोकऱ्यांमध्ये५० टक्के आरक्षण दिले. आंतरजातीय विवाह व नोंदणीचा कायदा केला. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आप्तेष्टांचे आंतरजातीय विवाह लावून दिले. सर्व सुधारणांचा स्वतः अंगिकार केल्यामुळेच शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणा लोकांपर्यंत अधिक परिणामकारकतेने पोहोचल्या. लोकांमध्ये जाऊन व्यवस्थेचे नेमके दुखणे जाणून घेण्याचे काम ते करत. त्यामुळे त्यांना करावयाच्या सुधारणांची नेमकी कल्पना यायची. त्याकाळातही त्यांनी स्त्री छळवणूक प्रतिबंधक कायदा,  देवदासी प्रथा निर्मूलन कायदा, अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा असे अनेक क्रांतिकारक कायदे केले. त्यांचे हे कार्य अनेक पिढ्यांनी लादलेली समाजव्यवस्थेची गुलामी दूर करुन अनेकांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारे ठरले. त्यांच्या सामाजिक सुधारणांचा अंगिकार प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात करावा, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की,  शाहू महाराजांनी सर्व घटकांना शिक्षण देऊन सामाजिक क्रांतीचा पाया रचला. ते खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ होते. त्यांनी लोककल्याणकारी राज्य राबविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले तर सूत्रसंचालन शिवाजी भोसले यांनी केले. या कार्यक्रमाला पत्रकार संजय निकस तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाचे सतिश बगमारे, हबीब शेख, गजानन इंगोले, सुनिल टोमे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवरुन लाईव्ह प्रसारण करण्यात आले.

Previous articleडेल्टा प्लस: अकोला, बुलडाण्यात सोमवारपासून निर्बंध कडक
Next articleओ.बी.सी. आरक्षण मिळाल्याशिवाय महाविकास आघाडीला स्वस्थ् बसू देणार नाही – आ.अॅड. आकाश फुंडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here