वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: आपल्या अनोख्या कार्यपद्धतीसाठी प्रख्यात असलेले अकोल्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी सोमवारी, 21 जूनरोजी वेशांतर करून अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देवून झाडाझडती घेतली. दरम्यान त्यांनी स्वस्त धान्य दुकान, पानटप-यावर छापे घालत अवैध गुटखाही जप्त केला.
ना. बच्चू कडू यांनी युसुफखाँ पठाण हे बनावट नाव धारण करून आज सर्वांनाच आश्यर्याचा धक्का दिला. सुरुवातीला त्यांनी महानगरपालिकेचा फेरफटका मारला. विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. दरम्यान त्यांनी मनपा समोर सुरु असलेल्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा यांची आंदोलकांसोबत भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्त त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला. पिएने सरकारी उत्तर देत जबाबदारी टाळली. विशेष म्हणजे एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. ते निघून गेल्यानंतर मात्र पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पातूरकडे वळवला. पातूर येथील कलश व एसबी या दोन पानसेंटर येथे गुटखा मागितला. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात गुटखा मागितला. तो दोन्ही पान सेंटर चालकांनी तुम्हाला जितका पाहिजे तितका देऊ, असे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांना दिले. त्यानंतर पालकमंत्री तहसीलमध्ये तिथे रेशनकार्ड तयार करण्यासाठी गेले. तिथे त्यांना नियमाप्रमाणे कागदपत्रे आणा तसे तयार होत नाही, असे सांगत शासकीय यंत्रणेने टाळले. तर त्या तिथून पालकमंत्र्यांनी एका रेशन दूकानाला भेट देत तांदूळ पाहिजे असे म्हटले. पण, राशन दूकानदाराने आता ऑनलाईन व्यवस्था आहे अशा प्रकारे कुठलाही तांदूळ देऊ शकत नाही असे म्हणत नकार दिला. आज जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केलेल्या वेषांतराने शासकीय यंत्रणा चांगलीच धास्तावली आहे. शासकीय यंत्रणा काम करत नसल्याने आज पालकमंत्र्यांना वेषांतराचा करत त्याचा आढावा घेतला आहे. या वेषांतराची चर्चा सर्वत्र सुरु होती.