वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: सोयाबीन बियाण्यांच्या थैलीवर आणि बिलावर शिक्के मारणाऱ्या तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाला जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. कांताप्पा खोत यांनी नोटीस बजावली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विकून स्वतःची जबाबदारी झटकणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकाला 14 जून रोजी कृषी अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या केंद्रचालकावर कोणती कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षीपासूनच सोयाबीन बियाण्यांबाबत वादाला तोंड फुटले आहे. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गेल्यावर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी काही कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी पळवाट काढून बियाणे तर विकणार, परंतु जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे उघडकीस आले आहे. थेट बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न विक्रेते करीत आहेत. ‘सदर सोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईन’, असा शिक्का तेल्हारा तालुक्यातील गणेश कृषी सेवा केंद्र चालकाने मारला आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून बियाणे निकृष्ट निघाल्यास सरळसरळ हात वर करण्याचा आहे. हा प्रकार उघडकीस येताच कृषी अधीक्षक कांताप्पा खोत यांनी गणेश कृषी सेवा केंद्र चालकास नोटीस बजावली आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी यांना संबंधित कृष्ण सेवा केंद्राचे रेकॉर्ड तपासणीचे आदेश दिले आहे. त्यासोबतच तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित गणेश कृषी सेवा केंद्रचालक यास 14 जून रोजी कृषी अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.